बीजिंग : भारत व चीन यांच्यातील द्विपक्षीय करारानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी नेत्यांना खडे बोल सुनावले. दोन्ही देशातील काही वादग्रस्त मुद्यांबाबत चीनचा दृष्टिकोन संबंधांना घातक ठरणारा आहे, असे मोदी म्हणाले. चीनने वेळीच आपला दृष्टिकोन बदलावा व तो अधिक दूरदर्शी व धोरणात्मक ठेवावा, ती गरज आहे, असे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसांच्या चीन दौऱ्यात २४ करार झाले; पण त्यात लहान-मोठे करार आहेत. औरंगाबाद-डुनहाँग सिस्टर सिटी व चेन्नई आणि चेंगडू येथे वाणिज्य दूतावास या पलीकडे फारसे काही हाती लागले नाही. या २४ करारांत सीमावाद, आर्थिक तूट वा थेट आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात काहीही नाही. त्यामुळे चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी रोखठोक बोलले. काही मुद्यावर चीनने आपला पूर्वापार चालत आलेला दृष्टिकोन कायम ठेवला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे संबंध दृढ होण्यात अडचणी येत आहेत. चीनने आपला दृष्टिकोन बदलावा, या मुद्यावर पुनर्विचार करावा, दृष्टिकोन अधिक दूरदर्शी व धोरणात्मक असला पाहिजे, असे मोदी यांनी स्पष्ट सांगितले. भारत व चीन यांच्यातील व्यापारी तूट हा कळीचा मुद्दा आहे. चीनकडून भारताला मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते; पण भारताकडून आयात मात्र त्या प्रमाणात केली जात नाही.