जगात सगळीकडेच आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे, कारणं अनेक आहेत; पण त्यामुळे लोकांच्या जीवनात अशांतता, अस्थिरता पसरली आहे. नैराश्य वाढलं आहे. सततचा हिंसाचार, अस्थिर परिस्थिती, डोक्यावर कायम असलेलं कुठलं ना कुठलं, टेन्शन.. यामुळे शांतपणे विचार करायला, आलेला तणाव घालवायलाही कोणाला वेळ नाही. त्यामुळेच जीवनाला, परिस्थितीला कंटाळून, एका हतबल क्षणी अनेकजण आपलं आयुष्य संपवताना दिसताहेत. जपानही याला अपवाद नाही. पण साधारण दहा वर्षांपूर्वी त्यांनी त्यावर एक उपाय शोधला आणि आता त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत.
जपानमध्ये विशेषकरून रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणात आत्महत्या व्हायच्या. २०२३मध्ये संशोधकांनी एक शोध लावला. निळ्या रंगाच्या प्रकाशामुळे मन शांत होतं, तणाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्यामुळे ताणतणावात असणाऱ्या व्यक्ती या रंगाच्या प्रकाशाच्या सान्निध्यात आल्या तर त्यांना शांततेची अनुभूती होते.
जपाननं नेमक्या याच संशोधनाचा फायदा घेतला आणि त्यांनी आपल्या बऱ्याच रेल्वेस्थानकांवर निळ्या रंगांच्या प्रकाशाची योजना केली. बहुतांश ठिकाणी त्यांनी निळ्या रंगाचे एलईडी लावले. त्याचे परिणाम आता दिसून येताहेत. यासंदर्भातला एक अभ्यास सांगतो, जपानमध्ये २००३मध्ये सुमारे ३५ हजार लोकांनी आत्महत्या केली होती. २०१७मध्ये मात्र आत्महत्या करणाऱ्यांची संख्या २१ हजारांवर आली होती. त्यानंतर ही संख्या आणखीच कमी झाली.
जपानच्या वासेडा विद्यापीठाच्या संशोधक आणि निळ्या रंगाच्या प्रकाशावर संशोधन करीत असलेल्या अभ्यासक मिचिको यूएडा यांचं म्हणणं आहे, आत्महत्येचं प्रमाण कमी करण्यात निळ्या रंगाच्या प्रकाशाचं योगदान महत्त्वपूर्ण ठरलं आहे. या रंगाचा शरीर-मनावर सकारात्मक परिणाम होतो. पण त्या म्हणतात, निळ्या रंगाचा सकारत्मक परिणाम होत असला तरी लोकांना जेव्हा निळ्या रंगाच्या प्रकाशाची सवय होईल, तेव्हा याचा परिणाम दिसणं बंद होईल.
त्यांचं म्हणणं आहे, निळ्या रंगाच्या प्रकाशाचा आत्महत्या रोखण्यासाठी उपयोग होतो आहे, त्यामुळे हा प्रयोग सुरू ठेवायला हवा; पण त्याचबरोबर रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यानंतरच उघडल्या जाणाऱ्या दरवाजांचीही योजना करायला हवी. लोकांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हा उपाय जास्त महत्त्वपूर्ण ठरेल. अर्थातच या प्रयोगासाठी लागणारा खर्च जास्त असल्यानं रेल्वे कंपन्यांना हा मार्ग तितकासा पसंत पडणार नाही. कारण त्या तुलनेनं रेल्वे प्लॅटफॉर्मवर निळ्या रंगाच्या प्रकाशाचे दिवे लावणं केव्हाही स्वस्तातला सौदा आहे.
आत्महत्या रोखण्याचा हा प्रयोग आता ब्रिटनमध्येही अवलंबला जातोय. तिथेही अनेक रेल्वेस्थानक आणि एअरपोर्टवर निळ्या रंगांच्या प्रकाशाची योजना करण्यात आली आहे. तिथल्या संशोधकांचंही म्हणणं आहे, जे लोक अत्यंत तणावात आहेत, ज्यांना रोजच ताणतणावाच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यांच्यात नैराश्याचं प्रमाण बरंच अधिक असतं. अशा लोकांना निळ्या रंगाच्या प्रकाशाच्या संपर्कात काही काळ जरी आणलं, तरी त्यांचं मन शांत होतं आणि त्यांचे आत्महत्येचे विचार दूर होऊ शकतात. त्यामुळे ब्रिटनमध्येही या प्रयोगाला आता चालना मिळते आहे.