नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात मलेशियाच्या पुढाकाराने क्वालालंपूर येथे झालेल्या इस्लामी शिखर परिषदेत सहभागी न होण्यासाठी पाकिस्तानला भरीला पाडल्यानंतर सौदी अरबस्तान आता फक्त काश्मीर या विषयावर चर्चा करण्यासाठी इस्लामी सहकार्य संघटेनेच्या (ओआयसी) देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची विशेष परिषद आयोजित करणार असल्याचे समजते.क्वालालंपूर येथील परिषद ही मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तय्यीप एर्दोगान व इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांच्या पुढाकाराने इस्लामी देशांच्या प्रस्थापित संघटनेस पर्याय म्हणून भरविली गेली होती. इस्लामी देशांच्या संघटनेची सूत्रे पूर्वापार सौदी अरबस्तान हलवत आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही क्वालालंपूर येथील परिषदेस जाणार होते व तेथे काश्मीरचा मुद्दा इस्लामी देशांपुढील एक समस्या म्हणून मांडणार होते; परंतु सौदी अरबस्तानने ऐनवेळी पाकिस्तानला क्वालालंपूर परिषदेस न जाण्यास राजी केले. त्याच्या बदल्यात आता सौदी अरबस्तान खास काश्मीरसाठी स्वतंत्र परिषद भरविणार असल्याचे कळते.सौदी अरबस्तानच्या पुढाकाराने होणाऱ्या ‘ओआयसी’ परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेची नक्की तारीख अद्याप ठरलेली नाही. मात्र, सौदी परराष्ट्रमंत्री फैजल बिन फरहान अल-सौद यांनी पाकिस्तान भेटीत आपला हा विचार इम्रान खान यांना कळविला.
काश्मीरच्या मुद्यावर सौदी घेणार इस्लामी देशांची विशेष परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 4:14 AM