पाकिस्तानच्या सत्ताकारणात नेहमीच काहीना काही उलथापालथ, घडामोडी घडत असतात. एकजण दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतो. कधी लष्कर पाकिस्तानी सरकार उलथविण्याचा प्रयत्न करत असते, कधी हे बाहुली सरकार स्वतःच लष्कराच्या मांडीवर जाऊन बसते, कधी सरकार पक्षामधील लोकच जुनं उट्टे फेडण्याचा प्रयत्न करत असतात, तर कधी सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये कोंबडे झुंजविण्याचा प्रकार सुरू असतो.
सध्याच्या घडीलाही पाकिस्तानच्या राजकीय सारीपाटावर तुंबळ युद्ध सुरू आहे, पण यावेळची ही लढाई सुरू आहे दोन दिग्गज बायकांमध्ये. एकमेकींना पाण्यात पाहत असताना, आजवरची सारी फिट्टंफाट करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. हे करत असताना राजकीय क्षितिजावरून केवळ एकमेकींनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांना नवऱ्यालाही अस्तंगत करण्याचा डाव त्या खेळत आहेत. कोण आहेत या दोन महिला? का त्यांच्यात एवढी जुंपली आहे? नळावरच्या भांडणापेक्षाही जोरात युद्ध' त्यांच्यात का सुरू आहे? या भांडणाकडे पाकिस्तानी जनतेचंच नव्हे, तर अख्ख्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. यामध्ये करमणूक तर आहेच, पण परस्पर एक- दुसऱ्याचा काटा निघून आपला रस्ता साफ होत असेल तर का नको, म्हणून इतर राजकारणीही त्यात तेल ओतताहेत. बुशरा बिबी आणि मरियम नवाज सध्या एकमेकींना भिडल्या आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बिबी आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पुतणी, पाकिस्तान मुस्लिम लिग नवाज गटाच्या (PML-N) उपाध्यक्ष मरियम नवाज यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही.
मरियम गेल्या काही महिन्यांपासून बुशरा बिबीच्या समोर बंदूक धरून इमरान खान यांच्यावर निशाणा साधत आहेत. एकाच दगडात त्यांना दोन पक्षी मारायचे आहेत. पाकिस्तानच्या राजकारणात अजूनही इमरान खान यांना महत्त्व आहे. जनतेमध्ये असलेला इमरान यांचा वरचष्मा संपविण्यासाठी मरियम यांनी बुशरा बिबी यांना झोडपायला सुरुवात केली आहे. "इमरान खान पंतप्रधान असताना जी सरकारी कंत्राटं दिली गेली, त्यांची 'वसुली' करण्याचं काम इमरान यांची पत्नी बुशरा बिबी करत होत्या. त्या माध्यमातून आपलं उखळ पांढरं करून घेताना या दाम्पत्यानं जनतेला वाऱ्यावर सोडलं आणि फक्त आपलंच घर भरलं," असे जाहीर आरोप सध्या मरियम करत आहेत. आपल्या आरोपांच्या पुष्टीसाठी अनेक पुरावेही त्यांनी सादर केले आहेत.
मरियम जाहीर सभांमध्ये जनतेलाच प्रश्न विचारत आहेत, अजून तुम्हाला किती पुरावे हवेत सांगा... गुन्ह्यांची यादीच इतकी मोठी आहे की, त्याची कित्येक पानं भरतील. लिखित पुरावे तर आमच्याकडे आहेतच, पण ऑडिओ आणि व्हिडीओ पुरावेही ढीगभर आहेत. बुशरा विबीच्या सांगण्यानुसारच पाकिस्तानी तोशाखान्यातील (सरकारी खजिना) गिफ्ट्स दुबईच्या बाजारात आणि जगात इतरत्र विकले गेले. बुशरा बिबी यांचा पूर्व पती, त्यांची बहीण, मुलं यांच्या बँक खात्यात अचानक करोडो रुपये कसे काय जमा व्हायला लागले? त्यांच्या बँक खात्यातील पैशांची ही 'खैरात' थांबायलाच तयार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांची पोस्टिंग आणि ट्रान्सफर यासाठी दिले-घेतलेले करोडो रुपये यांच्याच खात्यात कसे काय जमा झाले?
बिल्डरांकडून डायमंड रिंगसारख्या अतिव महागड्या वस्तू बुशरा यांनाच गिफ्ट कशा काय मिळतात?.. मरियम यांनी आरोप आणि प्रश्नांची अशी सरबत्तीच सोडली आहे. बुशरा बिबी आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) या इमरान यांच्या पक्षालाही बुशरा बिबी यांचा बचाव करणं कठीण जात आहे. कारण यासंबंधीचे पुरावे' आता माध्यमांपर्यंतही पोहोचले आहेत. बुशरा बिबी यांनी मात्र या साऱ्या आरोपांचा इन्कार आहे. राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. मी एक साधी गृहिणी, अराजकीय व्यक्ती आहे. तुमच्या राजकारणात मला कशाला ओढता, मला आणि माझ्या नवऱ्याला अडकविण्यासाठी मरियम यांनी रचलेलं हे कुभांड आहे, मरियम आणि त्यांचा पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात अखंड बुडालेले असताना, ते दुसऱ्यांकडे बोट कशासाठी दाखवताहेत...' अशा शब्दांत बुशरा बिबी आणि 'पीटीआय' या पक्षानंही मरियम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. दोन महिलांच्या भांडणाचा हा तमाशा पाकिस्तानात सध्या आवडीने चघळला जात आहे.
बुशरा, मरियम यांची कोर्टातही झुंज!मरियम यांच्या या सततच्या आरोपांमुळे बुशरा बिवीही आता चिडल्या आहेत. त्यांनी मरियम यांना कोटति खेचायचं ठरवलं आहे. अब्रूनुकसानीचा दावा त्या मरियम यांच्यावर ठोकणार आहेत. त्यासाठीची कायदेशीर नोटीसही त्यांनी मरियम यांना पाठविली आहे.