न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी येथे आगमन झाले. त्यांचा हा दौरा भरगच्च कार्यक्रमांचा आहे. त्यात ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत शाश्वत विकास परिषदेत भाषण करतील. न्यूज कॉर्पचे रूपर्ट मरडॉक यांनी आयोजित केलेल्या ‘मीडिया आणि कम्युनिकेशन्स’वरील गोलमेज परिषदेला ते उपस्थित राहतील. फॉर्च्युन फाईव्ह हंड्रेड कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर ते भोजन करतील.मोदी यांचे स्वागत भारताचे राजदूत अरुण सिंह, संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी राजदूत अशोक मुखर्जी, कॉन्सूल जनरल ज्ञानेश्वर मुळे आणि त्यांच्या पत्नींनी केले. नरेंद्र मोदींची २६ व २७ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियाला भेट असेल व दुसऱ्या दिवशी ते न्यूयॉर्कला येतील. शुक्रवारी त्यांचे संयुक्त राष्ट्रांत भाषण होईल. २६ सप्टेंबर रोजी भारताने जी-फोर राष्ट्रांची (ब्राझील, जपान व जर्मनी) शिखर परिषदही बोलावली आहे. मोदी हे फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग, अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा करतील. नरेंद्र मोदी या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची २८ सप्टेंबर रोजी भेट घेऊन चर्चाकरतील. (वृत्तसंस्था)
मोदींचे आज युनोत भाषण
By admin | Published: September 25, 2015 12:30 AM