दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये एका वेगवान कारने रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री स्थानिक वेळेनुसार २१.३० च्या सुमारास हा अपघात झाला. योनहाप वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका ६० वर्षीय व्यक्तीने आपल्या कारने एका ट्रॅफिक स्टॉपवर थांबलेल्या लोकांना चिरडलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते या घटनेचा तपास करत असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चुकीच्या बाजूने जात होती आणि पादचाऱ्यांना चिरडण्यापूर्वी इतर दोन वाहनांना धडकली. सोल सिटी हॉलजवळील चौकात हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळी अटक करण्यात आलेल्या चालकाने पोलिसांना सांगितलं की, कारने अचानक वेग घेतला.
सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. सेंट्रल सियोलच्या जंग-गु जिल्ह्यातील सार्वजनिक सुरक्षा अधिकारी किम सेओंग-हक यांनी सांगितलं की, पोलीस कार चालकाची चौकशी करत आहेत. चालक दारूच्या नशेत होता की अंमली पदार्थांच्या नशेत होता, याचा तपास अधिकारी करत आहेत.
जंगबू अग्निशमन केंद्राचे अग्निसुरक्षा प्रमुख किम चुन-सू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात १३ जखमींची ओळख पटली असून त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला असून तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) च्या अहवालानुसार, २०२२ मध्ये दक्षिण कोरियामध्ये एकूण रस्त्यांवरील मृत्यूंपैकी ३५% पादचारी होते. इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे. पण त्याच रिपोर्टमध्ये ओईसीडीने अलिकडच्या वर्षांत देशात रस्ते मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे अधोरेखित केले आहे.