सेऊल : जेट एअरवेजच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची स्पाइसजेटची योजना आहे. स्पाइसजेट सेवा संचालनालयाचा विस्तार करीत आहे. जेट एअरवेजची २२ विमाने स्पाइसजेटने आपल्या ताफ्यात सामील केली आहेत. सध्या स्पाइसजेटचे १४ हजार कर्मचारी असून, ताफ्यात १०० विमाने आहेत. आर्थिक अडचणीमुळे जेट एअरवेज कंपनी तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
स्पाइसजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितले की, आम्ही लक्षणीय संख्येने जेट एअरवेजच्या लोकांना सोबत घेतले आहे. ते पात्र आणि व्यावसायिक आहेत. पुढेही आम्ही जेट एअरवेजच्या कर्मचाºयांना नोकरी देऊ. जेट एअरवेजच्या ११०० कर्मचाºयांना सेवेत घेतले असून, हा आकडा २०००च्या वर जाईल. यात वैमानिक, चालक पथकाचे सदस्य, विमानतळ सेवा, सुरक्षेचे कर्मचारी आहेत.
स्पाइसजेटच्या ताफ्यात बोइंग ७३७, बॉम्बर्डियर क्यू ४०० आणि बी-७३७ मालवाहक विमान आहे. सध्या लक्ष्य छोट्या विमानांवर केंद्रित आहे, असे सिंह यांनी सांगितले. जेट एअरवेज मोठ्या विमानांचे संचालन करते. स्पाइसजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघाच्या (आयएटीए) संचालक मंडळावर निवड करण्यात आली आहे. लुफ्थांसा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्स्टन स्फोर यांची आयएटीएच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ एक वर्ष असेल.