अमेरिकेत एक मोठा विमान अपघात टळला आहे. १०० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन विमानानं रन वेवरुन उड्डाण घेणार होतं इतक्यात एक पक्षी विमानाच्या इंजिनला धडकला. त्यानंतर इंजिनमध्ये अचानक लाग लागली. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या विळख्यात अडकलं. आगीच्या ज्वाला पाहून विमानातील सगळेच प्रवासी भयभीत झाले होते.
हा प्रकार न्यू जर्सीच्या अटलांटिक सिटी विमानतळावरील आहे. ज्याठिकाणी उड्डाण घेण्यापूर्वीच एक पक्षी विमानाच्या इंजिनला धडकला. त्यानंतर स्पिरिट एअरलाईन्सचं हे विमान आगीच्या विळख्यात सापडलं. विमानात १०० पेक्षा अधिक प्रवासी होते तसेच पायलटसह विमानाचे क्रू मेंबर्सही होते. रिपोर्टनुसार, पक्षाने विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनाला धडक दिली. ज्यात इंजिनला आग लागली. काही क्षणातच ही आग भडकली. त्यानंतर तात्काळ पायलटनं विमान टेकऑफ होण्यापासून रोखलं आणि इमरजेन्सी सेवेला कॉल लावला.
विमानात आग लागल्यानंतर फ्लाइट अटेंडेंटने प्रवाशांना सामान सोडून तातडीने विमानातून खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. खाली उतरण्यासाठी एक स्लाइड लावण्यात आली होती. ज्याच्या आधारे विमानातून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. जोपर्यंत सर्व प्रवाशांना आणि विमान कर्मचाऱ्यांना आपत्कालीन दरवाजातून खाली उतरवत होते तोवर विमानतळावर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यांना आग विझवण्यात यश आलं. विमानाच्या केबिनमध्ये आग लागली नव्हती त्यामुळे धूर झाला नाही. साउथ जर्सी ट्रान्सपोर्टेशन प्राधिकरणानं सांगितले की, एअरबस ए ३२० विमानातील सर्व १०९ जण त्यात १०२ प्रवासी आणि पायलटसह ७ कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.