भारताच्या दबावानंतर, श्रीलंकेच्या हंबनटोटा पोर्टवर (Hambantota Port) येत असलेल्या चिनी जहाजाला रोखण्यात आले आहे. चिनी जहाज युआन वांग 5 च्या (China ship Yuan Wang 5) माध्यमाने हेरगिरीचा संशय आल्याने, श्रीलंकन सरकारने हे जहाज रोखण्याचा आदेश दिला आहे. यामुळे चीन जबरदस्त भडकला असून त्याने भारतावर निशाणा साधला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जहाज रोखण्यासाठी श्रीलंकेवर दबाव टाकणे, हे समजण्यापलिकडे असल्याचे चीनने म्हटले आहे.
काय म्हणाले चिनी परराष्ट्र मंत्रालय? माध्यमांतील वृत्तानुसार, श्रीलंकेने चीनला आपले जहाज युआन वांग 5 हंबनटोटा बंदरावर आणू नये, कारण यासंदर्भात भारताने चिंता व्यक्त केली आहे, असे सांगितले आहे. हे जहाज 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान बंदरावर पोहोचणार होते.
यावर प्रितिक्रिया देताना चिनी परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, बीजिंगने या प्रकरणाची दखल घेतली असून, चीन आणि श्रीलंका यांच्यातील सहकार्य निवड, दोन्ही देशांनी मुक्तपणे केली आहे. दोन्ही देशांमध्ये समान हितसंबंध आहेत आणि ते कुठल्याही तिसऱ्या पक्षाला प्रभावित करत नाहीत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, या चिनी जहाजात उपग्रह आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा शोध घेण्याची क्षमता असल्याचे मानले जाते. तसेच, देशाच्या सुरक्षिततेशी आणि आर्थिक हितांशी संबंधित सर्व घडामोडींवर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे भारताने म्हटले आहे.