कोलंबो - रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारने देशात आणीबाणी लागू करण्याची तयारी केली आहे. आज रात्री मध्यरात्रीपासून श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू होणार आहे. रविवारी जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. या बॉम्बस्फोटात 290 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. आज मध्यरात्रीपासून ही आणीबाणी लागू होणार आहे. दरम्यान, या बॉम्बस्फोटांप्रकरणी श्रीलंकन सरकारने प्रथमच एका संघटनेला जबाबदार धरले आहे. श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा श्रीलंकन सरकारचे प्रवक्ते राजीथा सेनारत्ने यांनी केला आहे.
Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 4:27 PM