श्रीलंका सध्या भीषण आर्थिक संकटातून जात आहे. देशात आणीबाणी लागू आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. त्रिंकोमाली नौदल तळासमोरही आज निदर्शने सुरू झाली. दरम्यान, माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी कोलंबोमधील 'टेम्पल ट्रीज' हे अधिकृत निवासस्थान सोडल्यानंतर त्रिंकोमाली नौदलच्या तळावर आश्रय घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येथील लोकांनी निदर्शने सुरू केली आहेत.
निदर्शनांदरम्यान महिंदा राजपक्षे यांचे भाऊ राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विट केले की, "मी लोकांना आवाहन करतो की, शांत राहा आणि हिंसाचार थांबवा, नागरिकांविरोधात बदलाची कारवाई करू नये, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत. राजकीय स्थिरता बहाल करण्यासाठी आणि सहमतीने आर्थिक संकट सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत."
महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर सोमवारी श्रीलंकेत हिंसाचार उसळला. कोलंबो आणि इतर शहरांमध्ये झालेल्या हिंसाचारात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. या घटनेपूर्वी काही तास आधी राजधानी कोलंबोमध्ये लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते आणि महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर देशव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
दरम्यान, त्रिंकोमाली हे श्रीलंकेच्या उत्तर-पूर्व किनाऱ्यावर वसलेले एक बंदर शहर आहे. महिंदा राजपक्षे यांच्या हंबनटोटा येथील वडिलोपार्जित निवासस्थानासह अनेक राजकारण्यांची घरे सोमवारी जाळण्यात आली. विशेष म्हणजे 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. मुख्यतः परकीय चलनाच्या कमतरतेमुळे हे संकट उद्भवले याचा अर्थ देश मुख्य अन्नपदार्थ आणि इंधनाच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही.