श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानावर, सरकार विरोधातील आंदोलकांनी कब्जा केला आहे. या आंदोलकांनी रविवारी एक बनावट कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच, देशाच्या आर्थिक संकटावरही चर्चा केली. याशिवाय मॉक कॅबिनेट बैठकीत आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घरी झालेल्या जाळपोळीवरही चर्चा केली.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसंदर्भातील मॉक मिटिंगमध्ये आंदोलकांनी एका परदेशी तरुणालाही सहभागी केले होते. हा परदेशी तरूण आंदोलकांनी राष्ट्रपतीभवनावर कब्जा केल्यानंतर तेथे फिरण्यासाठी गेला होता. याशिवाय, राष्ट्रपती भवनातील गोटबाया यांच्या बेडरूममध्ये, स्विमिंग पूलमध्ये आणि जिममध्ये आंदोलक मस्ती करतानाचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
राष्ट्रपती गोटबाया अंडरग्राउंड? -आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण मिळाल्यानंतर, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पळ काढला होता. ते सध्या कुठे आहेत? यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या लोकांमुळे 73 वर्षीय गोटाबाया राजपक्षे, आपल्या कुटुंबासह भूमिगत झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
7 दशकांतील सर्वात वाईट काळ - सध्या श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 22 दशलक्ष लोकसंख्या असलेला हा देश सात दशकांतील सर्वात वाईट काळ अनुभवत आहे. श्रीलंकेकडे परकीय चलनाची कमतरता असल्याने, तेथे इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवू लागला आहे. हे मुबलक प्रमाणावर खरेदी करण्यास तो असमर्थ आहे. अशा परिस्थितीत जनता रस्त्यावर उतरली आहे.