श्रीलंकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सर्वत्र हाहाकार माजल्याचे दृश्य आहे. येथील लोकांचा संताप सातव्या आसमानावर आहे. श्रीलंकेतील प्रशासकीय यंत्रणाही पार कोलमडली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या एक दिवसापासून आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावरच कब्जा केला आहे. या आंदोलकांनी सुरक्षा व्यवस्थेचे सर्व कडे भेदून राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. हे आंदोलक येथे मनसोक्त मजा मारताना दिसत आहेत.
महत्वाचे म्हणजे, राष्ट्रपती भवनात रविवारीही आंदोलक दिसून आले. तर, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे अद्यापही बेपत्ताच आहेत. श्रीलंकेत रविवारीही सरकारविरोधी निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रोनिल विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानांवर कब्जा केला आहे. मात्र, लंकेत एवढा एवढा हाहाकार माजला असतानाच, राष्ट्रपती नेमके कोठे आहेत, यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नाही.
7 दशकांतील सर्वात वाईट काळ - सध्या श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 22 दशलक्ष लोकसंख्या असलेला हा देश सात दशकांतील सर्वात वाईट काळ अनुभवत आहे. श्रीलंकेकडे परकीय चलनाची कमतरता असल्याने, तेथे इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवू लागला आहे. हे मुबलक प्रमाणावर खरेदी करण्यास तो असमर्थ आहे. अशा परिस्थितीत जनता रस्त्यावर उतरली आहे.