श्रीलंकेमध्ये काही महिन्यांत दुसऱ्यांदा राजकीय यादवी आली आहे. महागाई आणि उपासमारीने त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी आज राष्ट्रपतींच्या निवासस्थानालाच वेढा घालत ते ताब्यात घेतले. यानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी अज्ञातस्थळी पलायन केले आहे. यानंतर वेगवान घडामोडी घडल्या आहेत.
श्रीलंकेचे गेल्यावेळच्या नागरिकांच्या बंडानंतर पंतप्रधान झालेले रानिल विक्रमसिंघे यांनी सुरुवातीला राजीनामा देण्यास नकार दिला होता. परंतू आता त्यांनी राजीनामा दिला आहे. राजपक्षे देखील राजीनामा देणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे विक्रमसिंघे म्हणाले. विक्रमसिंघे यांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडीओ क़ॉन्फरन्सद्वारे बैठक केली.
खासदार डॉ. हर्षा डिसिल्वा यांनी बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आले याची माहिती दिली. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे तात्काळ राजीनामा देतील असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सध्याचे स्पीकर जास्तीत जास्त 30 दिवसांच्या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून काम करतील. संसद उर्वरित कालावधीसाठी नवीन राष्ट्रपती निवडेल. अंतरिम सर्वपक्षीय सरकार लवकरच नियुक्त होणार असून लवकरच निवडणुकाही होणार आहेत, असे चार निर्णय घेण्यात आले आहेत.
न्यायमंत्री विजेदासा राजपक्षे म्हणाले की, बहुतेक पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा यावर सहमती दर्शवली आहे. संसदेचे अधिवेशन बोलावून सर्वपक्षीय सरकार स्थापन करावे आणि त्यानंतर त्यांनी हंगामी अध्यक्षाची नियुक्ती करावी, असे बैठकीत ठरले परंतू याला विक्रमसिंघेंनी विरोध केला.