Sri Lanka Crisis : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील (Sri Lanka Crisis) परिस्थिती सध्या बिकट होत चालली आहे. एकीकडे राजपक्षे सरकार सातत्यानं टीका होत आहे आणि आता श्रीलंकेतील जनतेला रस्त्यावर उतरावे लागले आहे. श्रीलंकेत महागाईने उच्चांक गाठला असून संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. श्रीलंकेचे माजी केंद्रीय मंत्री आणि क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने भारताचे आभार मानले होते. आता, माजी फलंदाज सनथ जयसुर्यानेही भारत हा आमचा 'मोठा भाऊ' असल्याचे म्हटले आहे.
अर्जुना रणतुंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले. भारताने श्रीलंकेला मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार तर मानलेच पण भारत हा श्रीलंकेचा मोठा भाऊ म्हणूनही उल्लेख केला. त्यानंतर, आता जयसुर्यानेही भारत हा मोठा भाऊ असल्याचे सांगत भारताचे आभार मानले आहेत. तर, श्रीलंकेतील विदारक परिस्थितीचे वर्णन करताना सरकारविरुद्ध आपला आवाज उठवला आहे. गॅस संपलाय, लाईटही गेलीय, असे म्हणत सध्याच्या परिस्थितीला विद्यमान सरकारच जबाबदार आहे. वेळीच परिस्थितीवर नियंत्रण न आल्यास, ही आपत्तीजन्य परिस्थिती बनेल, असेही जयसुर्याने म्हटले आहे.
आणीबाणी जाहीर
आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिघडली आहे. एकीकडे राष्ट्रपती गाेटबाया राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत हाेत असल्याचे दिसत आहे. संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर ४१ खासदारांनी सत्ताधारी आघाडीला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. त्यामुळे राजपक्षे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मोदींचे आभार सरकारवर टीका
"जाफना विमानतळ सुरू करण्यासाठी भारताने मदत केली आणि त्यासाठी पंतप्रधान मोदींनी दयाळूपणा दाखवला. भारत आमच्यासाठी मोठा भाऊ आहे, भारताला आमच्या गरजा समजतात. या कारणास्तव भारताने पेट्रोल-औषध यांसारख्या गोष्टींचीही मदत केली आहे. येत्या काळात या सर्व गोष्टींची कमतरता भासू शकते," असं रणतुंगा म्हणाले. सध्याच्या राजपक्षे सरकारवर टीका करताना रणतुंगा म्हणाले की, "सध्याच्या सरकारमध्ये असे काही लोक आहेत ज्यांना समाजात फूट निर्माण करायची आहे. श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीत सर्वत्रच समस्या आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचे सरकार अहंकारी असल्यासारखे वागत आहे." सरकारमध्ये काही लोक आहेत ज्यांना हिंसाचार हवा आहे, असे होऊ नये. यासाठी मला खूप काळजी वाटते असंही त्यांनी स्पष्ट केलं.