आर्थिक संकटामुळे सत्ता उलथवून लावणाऱ्या श्रीलंकेमध्ये निवडणुका होत आहेत. शनिवारी मतदान झाले असून आज मतमोजणी सुरु झाली आहे. सत्ताधारी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तर अनुरा कुमारा दिसानायके यांना पहिल्या राऊंडमध्ये राष्ट्रपती पदाने हुलकावणी दिली आहे. कोणालाच ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते न मिळाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील लोक अनुराकडे 'मसिहा' म्हणून पाहत आहेत. गरिबांना डोळ्यासमोर ठेवून धोरणे बनवण्याचे आणि करात सवलत देण्याचे आश्वासन त्यांनी निवडणुकीत दिले आहे. अनुरा यांना भारतविरोधी आणि चीनधार्जिणे मानले जात आहे.
श्रीलंकेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदाच्या शर्यतीचा निर्णय दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीने घेतला जात आहे. आघाडीचे दोन उमेदवार विजयी घोषित करण्यासाठी जेव्हा ५० टक्के मते मिळत नाहीत तेव्हा श्रीलंकेमध्ये दुसऱ्या त्यातही ५० टक्के झाले नाहीत तर तिसऱ्या फेरीचा पर्याय वापरण्याची तरतूद आहे.
पहिल्या फेरीत दिसानायके यांना ४२.३१ टक्के मते पडली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विरोधी पक्षाचे नेते साजिथ प्रेमदासा यांना ३२.७६ टक्के मते मिळाली आहेत. ऐतिहासिक दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु करावी लागल्याने राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्यासह त्याखालील सर्व उमेदवार अपात्र झाले आहेत. आता दुसऱ्या राऊंडची मते ही पहिल्या राऊंडच्या मतांमध्ये मोजून त्यानुसार दोघांपैकी कोणाला ५० टक्के मते मिळतात हे पाहिले जाणार आहे. या राऊंडमध्येही एकालाही ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत तर तिसऱ्या फेरीला सुरुवात केली जाणार आहे.
दिसानायके यांचा जनता विमुक्ती पेरामुना हा पक्ष श्रीलंकेतील भारतविरोधी पक्ष मानला जातो. त्यांनी अनेकदा भारताला उघडपणे विरोध केलेला आहे. डावा पक्ष असल्याने तो चीनच्या बाजूने झुकलेला आहे. जेव्हीपी पक्ष हा चिनी हस्तक्षेप आणि आर्थिक धोरणांचा समर्थक आहे. दिशानायके यांनीही अनेकदा भारताला उघड विरोध केलेला आहे. तसेच त्यांचा मार्क्सवाद आणि लेलिनवादाकडे असलेला कल पाहता ते भविष्यात चीनचे समर्थक ठरू शकतात.