श्रीलंकेत गंभीर आर्थिक संकट असताना निदर्शने तीव्र झाली आहेत. येथील परिस्थिती हळूहळू बिकट होत आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून आज रात्रीपासून कर्फ्यू (Sri Lanka Curfew) लागू करण्यात आला आहे. आज रात्री ८ ते मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. राष्ट्रपतींच्या मीडिया विभागाने ही माहिती दिली आहे.
श्रीलंका स्वातंत्र्यापासून गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. देशात महागाई शिगेला पोहोचली आहे. वीज संकटासोबतच पेट्रोल, डिझेलसह दैनंदिन वस्तूंचाही मोठा तुटवडा आहे. रविवारी देशाचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे म्हणाले की, "खूप काही करायचे आहे. आम्ही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत आहोत".
दरम्यान, देशातील आर्थिक संकटावरून राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात व्यापक निदर्शने सुरू आहेत. सरकार समर्थक आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर शेकडो जखमी झाले आहेत. त्यानंतर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आणि रानिल विक्रमसिंघे यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली.
श्रीलंकेत निदर्शने सुरूचआंदोलकांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत गोटाबाया राजपक्षे हे राष्ट्राध्यक्ष आहेत, तोपर्यंत ते त्यांचे आंदोलन सुरू ठेवतील. तसेच, आंदोलकांनी नवीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना कठपुतली संबोधले आणि त्यांच्या चार कॅबिनेट मंत्र्यांच्या नियुक्तीवर टीका केली. दरम्यान, 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून श्रीलंका हा महामारी, तेलाच्या वाढत्या किमती आणि राजपक्षे यांच्या कर कपातीमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.