श्रीलंकेमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवरचे नेते अनुरा कुमारा दिशानायके यांनी विजयी आघाडी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होत आहे. या मतमोजणीमध्ये २२ पैकी ७ जिल्ह्यांमधील पोस्टल मतमोजणीमध्ये दिशानायके यांना ५६ टक्के मतं मिळाली आहेत. एकप्रकारे दिशानायके यांना अजेय आघाडी मिळाली असून, त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि साजिथ प्रेमदासा यांना प्रत्येकी १९ टक्के मतं मिळाली आहेत.
दिशानायके यांच्या जनता विमुक्ती पेरामुना पक्षाला श्रीलंकेमध्ये दोन वर्षांपूर्वी आलेल्या आर्थिक संकटानंतर खूप लोकप्रियता मिळाली होती. दिशानायके हे त्यांच्या आवेशपूर्ण भाषणांमधून गरीबांना मदत आणि डाव्या धोरणांच्या केलेल्या समर्थनांमुळे उत्तरोत्तर लोकप्रिय होत गेले आहेत. दिशानायके हे कोलंबो जिल्ह्यातील विद्यमान खासदार आहेत. तसेच २०१९ मध्येही त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते पराभूत झाले होते. दरम्यान, यावेळी ते एनपीपी आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. एनपीपी ही अनेक पक्षांची मिळून बनलेली आघाडी आहे. तसेच दिशानायके तिचं नेतृत्व करत आहेत.
दरम्यान, दिशानायके यांचा जनता विमुक्ती पेरामुना हा पक्ष श्रीलंकेतील भारतविरोधी पक्ष मानला जातो. त्यांनी अनेकदा भारताला उघडपणे विरोध केलेला आहे. डावा पक्ष असल्याने तो चीनच्या बाजूने झुकलेला आहे. जेव्हीपी पक्ष हा चिनी हस्तक्षेप आणि आर्थिक धोरणांचा समर्थक आहे. दिशानायके यांनीही अनेकदा भारताला उघड विरोध केलेला आहे. तसेच त्यांचा मार्क्सवाद आणि लेलिनवादाकडे असलेला कल पाहता ते भविष्यात चीनचे समर्थक ठरू शकतात.