श्रीलंकेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याच दरम्यान राष्ट्रपती गोटाबाया यांचा लहान भाऊ बासिल राजपक्षे यांनाही याचा अनुभव आला. श्रीलंका सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बासिल यांना विमानतळ कर्मचाऱ्यांनीच रोखले असल्याची घटना आता समोर आली आहे.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे भाऊ बासिल राजपक्षे हे कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. बासिल हे देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, विमानतळावर इमीग्रेशन कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. विमानतळ कर्मचारी युनियनने बासिल राजपक्षे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. इमिग्रेसन कर्मचारी आणि युनियनने रात्रीच कामबंद आंदोलन केले. घोषणाबाजीनंतर बासिल राजपक्षे यांना माघारी जावे लागले.
बासिल राजपक्षे हे श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबीयांतील अनेकजण सरकारमध्ये सहभागी होते. अनेकांकडे महत्त्वाची खाती होती. श्रीलंकेतील आर्थिक संकटासाठी राजपक्षे जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राष्ट्रपती गोटाबाया हे देश सोडून गेले असल्याचे म्हटले जात आहे. तर, गोटाबाया अद्यापही देशात असल्याचा दावा सरकारी यंत्रणांकडून करण्यात आला आहे. राष्ट्रपती गोटाबाया यांनी अजूनही औपचारिकपणे राजीनामा दिला नाही. सध्या ते कुठे आहेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आपल्या पदावरून येत्या बुधवारी, १३ जुलै रोजी पायउतार होण्याची तयारी दर्शविली आहे. त्या देशात सर्वपक्षीय हंगामी सरकार बनविण्यास तेथील विरोधी पक्षांनी होकार दिला आहे. श्रीलंकेत निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग शांततापूर्ण मार्गाने सोडविण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जनतेने शांतता राखावी, असे आवाहन त्या देशाचे लष्करप्रमुख जनरल शावेंद्र सिल्वा यांनी केले आहे.