Sri Lanka Crisis: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानालाही आग लावण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक नोटा मोजताना दिसत आहेत.
खरं तर, मोठ्या संख्येने आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये काही आंदोलक नोटा मोजताना दिसत आहेत. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या घरातून विरोधकांना ही रक्कम मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ही कोट्यवधी रुपयांची रोकड असल्याची माहिती आहे. श्रीलंकन वृत्तपत्र 'डेली मिरर'ने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनातून जप्त करण्यात आलेली रक्कम सुरक्षा युनिट्सकडे सोपवण्यात आली आहे.
बॅरिकेड्स तोडल्यानंतर हजारो आंदोलक शनिवारी कोलंबोच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात घुसले. राष्ट्रपतींच्या निवासस्थानात मोठ्या संख्येने लोक घुसले आणि तोडफोड केली. यावेळी आंदोलकांनी बेडरूमपासून स्वयंपाकघर, बाथरूमपर्यंत सर्वत्र कब्जा केला होता. अनेक लोक राष्ट्रपती निवासाच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना दिसले, तर काही बेड आणि सोफ्यावर आराम करताना दिसले. काही लोक स्वयंपाकघरात अन्न खातानाही दिसत आहेत.