कोलंबो : देशातील पर्यटन क्षेत्राची पुनर्बांधणी करण्याच्या प्रयत्नांदरम्यान भारत आणि इतर सहा देशांतील पर्यटकांना मोफत पर्यटन व्हिसा देण्याच्या धोरणाला श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्री साबरी यांनी एका निवेदनात सांगितले की, ३१ मार्च २०२४ पर्यंत पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
मंत्रिमंडळाने तात्काळ प्रभावाने भारत, चीन, रशिया, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंडमधील प्रवाशांना मोफत पर्यटनास मान्यता दिली आहे. या देशांतील पर्यटकांना श्रीलंकेला भेट देण्यासाठी कोणत्याही शुल्काशिवाय व्हिसा मिळू शकणार आहे. २०१९ मध्ये ईस्टरच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेतील पर्यटकांचे आगमन कमी झाले होते. या स्फोटांमध्ये ११ भारतीयांसह २७० लोकांचा मृत्यू झाला होता, तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते.
परराष्ट्र मंत्री साबरी म्हणाले की, तात्काळ सुरू झालेला पायलट प्रोजेक्ट ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवला जाईल. दरम्यान, मार्चच्या सुरुवातीला परराष्ट्र मंत्री साबरी म्हणाले होते की, त्यांच्या देशाचे भारतासोबतचे संबंध 'आमच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात महत्त्वाचे आहेत'. या देशांतील पर्यटक आता कोणत्याही शुल्काशिवाय श्रीलंकेचा व्हिसा मिळवू शकतात, हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे. भारत हा ऐतिहासिकदृष्ट्या श्रीलंकेच्या अंतर्गामी पर्यटनाचा मुख्य स्त्रोत आहे.
पीटीआयच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, भारत ३० हजारहून अधिक पर्यटकांसह आघाडीवर आहे, जे एकूण २६ टक्के आहे, तर चिनी पर्यटक ८ हजारहून अधिक पर्यटांकासह दुसरा सर्वात मोठा समूह आहे. दरम्यान, १९४८ मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून गंभीर आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेला श्रीलंका सध्या राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनांमुळे राजकीय गोंधळाचा सामना करत आहे.