श्रीलंकेतील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक आवाहन केले आहे. “श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणीही येवो, माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील सर्व राजकीय पक्षांना आणि तेथील लोकांना एक नम्र विनंती आहे की या संकटातून बाहेर येण्यासाठी मा लंका आणि तेथील लोकांची मदत करत राहा,” असं प्रेमदासा म्हणाले. त्यांनी ट्वीट करत भारताला हे आवाहन केलं आहे.
श्रीलंकेच्या संसदेत ४४ वर्षात पहिल्यांदाच आज (२० जुलै) थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. हंगामी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लास अल्हप्परुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. देश सोडून पळून गेलेल्या गोटाबाया राजपक्षे यांच्या जागी या तिघांपैकी एकाची निवड केली जाईल.
विक्रमसिंघे आघाडीवर?मात्र, ७३ वर्षीय विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत अजूनही आघाडीवर असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. परंतु २२५ जागांच्या संसदेत बहुमत सिद्ध करणे इतकं सोपं नसेल. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती बिकट होण्यापूर्वी ऑगस्ट २०२० ची संसदीय संरचना पाहिली तर १४५ खासदार संख्या असलेल्या एसएलपीपी पक्षातून ५२ खासदार फुटले होते. यानंतर ९३ खासदार राहिले होते. त्यानंतर ४ जण परतले होते. विक्रमसिंघे यांना बहुमतासाठी ११३ खासदारांचं समर्थन आवश्यक आहे.