कोलंबो - श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आपल्या पदावरून येत्या बुधवारी, १३ जुलै रोजी पायउतार होण्याची तयारी दर्शविली आहे. त्या देशात सर्वपक्षीय हंगामी सरकार बनविण्यास तेथील विरोधी पक्षांनी होकार दिला आहे. श्रीलंकेत निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग शांततापूर्ण मार्गाने सोडविण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जनतेने शांतता राखावी, असे आवाहन त्या देशाचे लष्करप्रमुख जनरल शावेंद्र सिल्वा यांनी केले आहे.
हजारो निदर्शकांनी राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या शासकीय निवासस्थानाचा शनिवारी ताबा घेतला. श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. राजीनामा देण्याच्या मागणीकडे गोताबाया राजपक्षे यांनी आजवर दुर्लक्ष केले होते. मात्र, लोकांच्या असंतोषाचा शनिवारी पुन्हा भडका उडाल्यानंतर राजपक्षे यांनी बुधवारी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. श्रीलंकेचे लष्करप्रमुख सिल्वा यांनी म्हटले आहे की, देशात शांतता कायम राहण्यासाठी जनतेने लष्कर व पोलिसांना सहकार्य करावे. राष्ट्राध्यक्ष गोताबाया यांच्या शासकीय निवासस्थानी निदर्शक रविवारीही ठिय्या मांडून बसले होते.
राष्ट्राध्यक्षांच्या घरात लाखो रुपयांचे घबाड
राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्या शासकीय निवासस्थानी लाखो रुपयांचे घबाड मिळाल्याचा दावा निदर्शकांनी केला आहे. या निवासस्थानाचा ताबा घेतलेले निदर्शक तिथे सापडलेल्या नोटा मोजत असतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर झळकला आहे. हे सर्व पैसे सुरक्षा दलाच्या हाती सोपविण्यात आले आहेत. गोताबाया राजपक्षे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी लाखो रुपये का जमा करून ठेवले होते असा सवाल निदर्शक विचारत आहेत.