कोलंबो : श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला, तर बरखास्त करण्यात आलेले पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी संसदेत बहुमत असल्याचा दावा केला आहे. जर या संकटावर तोडगा काढण्यात आला नाही, तर रस्त्यांवर रक्तपात होईल, असा इशारा अध्यक्ष कारू जयसूर्या यांनी दिला आहे. नव्या मंत्रिमंडळालाही शपथ देण्यात आली असून यात १२ मंत्री आहेत. यात एक राज्यमंत्री व एक उपमंत्री आहे. राजपक्षे यांच्याकडे अर्थमंत्रीपद आहे.राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून बरखास्त केल्यानंतर श्रीलंकेत राजकीय संकट उभे ठाकले आहे. त्यातच अर्जुन रणतुंगा यांच्या अटकेने तणाव अधिकच वाढला आहे. राष्ट्रपती सिरिसेना यांनी शुक्रवारी रात्री विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून बरखास्त केले होते. त्यानंतर राजपक्षे यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली होती. राष्ट्रपतींचा हा निर्णय घटनाबाह्य आहे. श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार पंतप्रधानांना काढून टाकण्याचा वा पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही. (वृत्तसंस्था)रणतुंगा यांना अटकश्रीलंकेचे पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना सोमवारी अटक करण्यात आली. रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाने रविवारी पंतप्रधान राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता. रणतुंगा हे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू मानले जातात. क्रिकेटर ते राजकीय नेता असा रणतुंगा यांचा प्रवास आहे.
श्रीलंकेतील राजकीय संकट वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 4:18 AM