श्रीलंकेमध्ये मोठी उलथापालथ घडली आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यावरही आंदोलकांचा राग काही शांत झालेला नाही. त्यांनी राष्ट्रपती भवनावरून थेट विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळविला होता. तिथे त्यांनी विक्रमसिंघे यांचे घर जाळले आहे.
सकाळीच राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर लाखो आंदोलकांनी कब्जा केला होता. तिथे तोडफोड, स्विमिंग पुलमध्ये मौजमजा, मद्य प्राशन केल्यावर हे आंदोलक रात्रीच्या सुमारास अधिक हिंसक झाले. पत्रकारांना मारहाण करण्यात आली. यानंतर हे आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाले होते.
आता काही व्हिडीओंमध्ये विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानातून धूर आणि आगीचे लोळ उठताना दिसत आहेत. पंतप्रधान निवासस्थानाबाहेर हजारोंच्या संख्येने आंदोलक जमल्याचे दिसत आहे. श्रीलंकन लष्कराने विक्रमसिंघे यांना अज्ञात स्थळी लपविले आहे. असे असले तरी निवासस्थानामधील लोकांचे काय झाले, हे अद्याप कळू शकलेले नाही. जाळले ते घर विक्रमसिंघे यांची खासगी मालमत्ता असल्याचा दावा काही व्हिडीओंमधून केला जात आहे.
मे महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनात राजपाक्षे यांचे वडिलोपार्जित घर आंदोलकांनी जाळले होते. यानंतर अनेक खासदारांची, मंत्र्यांची घरे देखील जाळण्यात आली होती. आज पुन्हा पंतप्रधानांचे घर जाळण्यात आले आहे.