Sri Lanka Crisis: श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा या संकटाच्या परिस्थितीत सर्वजण मदतीसाठी पुढे येत आहेत. यातच श्रीलंकेचा विश्वचषक विजेता खेळाडू रोशन महानामा आपल्या देशवासियांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगेत उभ्या असलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तो करतोय.
पेट्रोल पंपावर चहाचे वाटपविशेष म्हणजे, श्रीलंकेचा हा माजी क्रिकेटपटू आपल्या देशातील लोकांना चहा वाटतोय. या क्रिकेटपटूने स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली. महानमाने ट्विटमध्ये लिहिले की, 'आम्ही वॉर्ड प्लेस आणि विजेरामा मावठाभोवती पेट्रोलसाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना जेवण दिले. या रांगा दिवसेंदिवस लांबत चालल्या आहेत. रांगेतील लोकांचे आरोग्य बिघडत आहे. प्रत्येकाने काळजी घ्या. एकमेकांना मदत करा.' श्रीलंकन क्रिकेटपटूच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रोशनची कारकीर्दरोशन महानमा यांने श्रीलंकेसाठी 52 कसोटी आणि 213 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 4 शतके आणि 11 अर्धशतके झळकावत एकूण 2576 धावा केल्या आहेत. तसेच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 शतके आणि 35 अर्धशतकांच्या मदतीने 5162 धावा केल्या. 1996 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचाही तो भाग होता. 1996 च्या विश्वचषक फायनलमध्ये श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. 1999 च्या विश्वचषकानंतर महानमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.