Stampede in Football: फुटबॉल सामन्यांमध्ये प्रेक्षकांनी गोंधळ घातल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेकदा जीवितहानीदेखील झाली आहे. फुटबॉल आणि अशा घटनांचा जुना संबंध आहे. ताजे प्रकरण साल्वाडोरचे आहे. येथे एका फुटबॉल सामन्यादरम्यान गोंधळ होऊन जवळपास 12 जणांचा मृत्यू झाला, तर 500 जण जखमी झाले आहेत.
ही धक्कादायक घटना साल्वाडोरच्या राजधानीपासून 25 मैल ईशान्येस असलेल्या मोन्युमेंटल स्टेडियममध्ये घडली आहे. या स्टेडियममध्ये देशांतर्गत अलियान्झा क्लब आणि एफएएस क्लब यांच्यात उपांत्यपूर्व सामना खेळवला जाणार होता. स्टेडियमची क्षमता 44836 होती, पण मॅच पाहण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक स्टेडियममध्ये दाखल झाले.
प्रेक्षकांची संख्या इतकी जास्त होती की, त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांचा गोंधळ सुरू झाल्यानंतर अवघ्या 16 मिनिटांनी सामना रद्द करण्यात आला. यानंतर स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी सुरू झाली. लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 500 लोक जखमी झाले आहेत.
आता हा अपघात कसा झाला हा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, या सामन्याची बनावट तिकिटे लोकांना विकण्यात आली, त्यामुळे ही घटना घडली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. स्थानिक पोलीसही या प्रकरणाचा तपास करतील. सर्वांची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे साल्वाडोर फुटबॉलच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.