रमजानच्या काळात मोफत वाटल्या जाणाऱ्या पिठावरून पाकिस्तानात गोंधळ पाहायला मिळत आहे. पिठासाठी लोक काहीही करायला तयार आहेत. रमजानच्या पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ सरकार महागाईने त्रस्त असलेल्या गरिबांना मोफत पीठ वाटप करत आहे. रविवारी मोफत पिठाचे वाटप सुरू असताना खैबर पख्तुनख्वामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
पाकिस्तानच्या द एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मर्दान येथील क्रीडा संकुलात मोफत पीठ वाटपासाठी कोणतीही योग्य पद्धत नव्हती. नीट नियोजन नव्हतं. फुकट पिठासाठी पात्र असलेल्यांनाही प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी तासनतास रांगेत उभे राहायला सांगितलं. संतप्त लोकांनी आंदोलन करत नौशेरा रोड अडवला. आंदोलनादरम्यान पोलिसांवर आणि क्रीडा संकुलाच्या गेटवर दगडफेक करण्यात आली.
प्रत्युत्तरादाखल, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार केला, अनेक पाकिस्तानी जखमी झाले. या घटनेत अनेक महिला आणि वृद्धही बेशुद्ध झाले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज पिठाची चोरी होत आहे. बनावट स्लिप देऊन गोरगरिबांना पिठाच्या पोत्या देण्याऐवजी बाजारात चढ्या भावाने विकल्या जात आहेत.
पाकिस्तानमध्ये मोफत आणि अनुदानित पिठाच्या वितरणादरम्यान यापूर्वीही चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रमजानच्या काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की रमजान महिन्यात सुमारे 1.58 कोटी कुटुंबांना मोफत गव्हाचे पीठ दिले जाईल. त्यासाठी पाकिस्तानमध्ये वीस हजार अतिरिक्त वितरण केंद्रेही उघडण्यात आली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"