मनोरंजन विश्वातील चमकता तारा आणि उदयोन्मुख स्टँडप कॉमेडियन नील नंदा यांचे निधन झाले. नील नंदा यांच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. कारण, काही दिवसांपूर्वीच चाहत्यांनी आपल्या लाडक्या कॉमेडियनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नील नंदाच्या निधनाचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, एका लोकप्रिय कलाकाराची अशी अचानक एक्झिट सर्वांनाच दु:खावणारी आहे.
नील हे मूळ भारतीय वंशाचे होते, पण लॉस एंजिलिसमध्ये वास्तव्यास होते. लहानपणापासूनच कॉमेडी जगताशी त्यांना जवळीक वाटत. त्यामुळेच, कॉमेड हेच क्षेत्र त्यांनी करिअर म्हणून निवडलं होतं. नीलचे मॅनेजर ग्रेस वाइस यांनी त्यांच्या निधनाबद्दलचे वृत्त खरे असल्याचं सांगितलं. ग्रेस हे गेल्या ११ वर्षांपासून नील यांच्यासमवेत होते. नील यांचे निधन झाल्याचे सांगताना अतिशय दु:ख होत असल्याचंही त्यांनी म्हटलं. नील हे अतिशय महान व शानदार कॉमेडियन होते. वयाच्या १९ व्या वर्षीपासून मी त्यांच्यासमवेत काम करत आहे, असे ग्रेस यांनी सांगितलं.
दरम्यान, नील यांचे निधन कसे झाले, याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही. त्यांच्या कुटुंबीयांनीही याबाबत काहीही बोलण्यास टाळले आहे. नील यांचे फॅन्सही सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. नील यांचे जुने व्हिडिओ आणि फोटो शेअर करत त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यातूनच, त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.