लंडन : जगप्रसिद्ध ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग (७३) हे आपल्या नावाचा ट्रेडमार्क (बँ्रड) तयार करणार आहेत. हॉकिंग यांनी बौद्धिक संपदा कार्यालयाकडे आपले नाव ट्रेडमार्कसाठी औपचारिकरीत्या नोंदविले आहे. ‘संडे टाइम्स’ने हे वृत्त दिले.यापूर्वी ब्रिटिश शास्त्रज्ञ ब्रायन कोक्स, लेखिका जे. के. रोलिंग व फूटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम यांनी आपले नाव बँ्रड म्हणून नोंदवून घेतलेले आहे. नुकत्याच आॅस्कर पुरस्काराने गौरविल्या गेलेल्या ‘द थिअरी आॅफ एव्हरीथिंग’ या चित्रपटाने स्टीफन हॉकिंग यांचे नाव चर्चेत आले होते. इतरांनी त्यांच्या नावाचा अयोग्य उत्पादनात वापर करण्यास प्रतिबंध करण्याच्या हेतूने हॉकिंग आपल्या नावाचा ब्रँड करू इच्छितात. स्वत:च्या नावाचा ट्रेडमार्क करून घेणे हा हॉकिंग यांचा वैयक्तिक प्रश्न असून तो विद्यापीठाचा नाही. आपल्या नावाने जे यश प्राप्त केले आहे ते व आपले नाव हॉकिंग सुरक्षित राखू इच्छितात, असे केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले. या युनिव्हर्सिटीत हॉकिंग हे डिपार्टमेंट आॅफ अप्लाईड मॅथेमॅटिक्स अँड थिओरेटिकल फिजिक्सचे संचालक आहेत. त्यांच्या नावाचा ब्रँड कॉम्प्युटर गेम्स, विजेवर चालणाऱ्या खुर्च्या, भेटकार्डे आणि आरोग्याची उपकरणे यांना लागू राहील. (वृत्तसंस्था)
स्टीफन हॉकिंग करणार आपल्या नावाचा ब्रँड
By admin | Published: March 30, 2015 11:15 PM