न्यू यॉर्क- अमेरिकेतील सीएटल विमानतळावरुनविमान कंपनीच्याच कर्मचाऱ्याने विमान चोरण्याची घटना घडली आहे. हे चोरीचे विमान काही वेळाने जवळच्याच एका बेटावर कोसळले.
विमानतळावरील सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे एका व्यक्तीने बेकायदेशीररित्या विमानाचा ताबा घेऊन विमानाचे उड्डाण केले. यामुळे सीएटल ताकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद करावे लागले. या विमानाचा पाठलाग करण्यासाठी दोन एफ 15 जेट विमानेही पाठविण्यात आली होती. विमान कोसळल्यानंतर विमानचोर कर्मचारी त्यातून वाचला आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. स्थानिक शहराच्या शेरिफ ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार विमान पळवणारा माणूस 29 वर्षांचा होता आणि हा दहशतवादी हल्ला नाही.
विमान कोसळण्याआधी विमानचोराला ते उतरवण्यासाठी एटीसीने अनेकदा सांगून पाहिले मात्र त्याने विमान क्रॅश केले. हे विमान होरायझन एअर क्यू 400 याप्रकाराचे होते. ते अलास्का एअरलाइन्सचे होते. जवळच केट्रोन बेटावर ते कोसळले. विमान चोरणारा माणूस अत्यंत विचित्र पद्धतीने वागत असल्याचे एटीसीच्या लक्षात आले. विमानात इंधन कमी असल्याबद्दल त्याने काळजीही व्यक्त केली तसेच मी व्हीडिओ गेम खेळले असल्यामुळे विमान उतरवता येईल असे तो म्हणत असल्याचे रेकॉर्ड झाले आहे.