जकार्ता : आकाशातून पडलेल्या दगडाच्या विक्रीतून एका समान्य माणसाला चक्क कोट्यवधी रुपयांची कमाई झाल्याचा दुर्मिळ प्रकार इंडोनेशियात उघड झाला आहे.
जोशुआ हुतागालुंग याचा शवपेट्या तयार करण्याचा व्यवसाय आहे. ऑगस्ट महिन्यातील एका दुपारी तो निवांतपणे त्याच्या घराच्या परसात शवपेट्या तयार करण्याचे काम करत असताना अचानक मोठा आवाज झाला. त्याच्या घराचे छप्पर फुटले. प्रथमत: प्रचंड घाबरलेल्या जोशुआने थेट घरापासून लांब धाव घेतली. मात्र, सर्व धुरळा खाली बसल्यावर तो पुन्हा घराकडे आला. घराचे छत फुटल्याने वैतागलेल्या जोशुआने हा प्रकार नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला एका कोपऱ्यात एक मोठा दगड पडल्याचे आढळून आले. हा दगड सामान्य नव्हता. तो थेट अवकाशातून पडलेला अशनी होता! अर्थात त्याला हे कळायला बरेच दिवस जावे लागले.
दुर्मीळ दगडांचे संकलन करणाऱ्या जेरेड कॉलिन्स या अमेरिकी माणसाने जोशुआला दगड विकण्याची ऑफर दिली. जोशुआने ती स्वीकारली. चक्क ९.८ कोटी रुपयांना जोशुआने दगड कॉलिन्सला विकला. कॉलिन्सनी तो दगड जे पायटेक या अन्य शास्त्रज्ञाला विकला असून सध्या हा दुर्मीळ खडक अरिझोना विद्यापीठाच्या अशनी अभ्यास केंद्रात द्रवरूप नायट्रोजनमध्ये सुस्थितीत ठेवण्यात आला. त्याच्यावर अभ्यास सुरू आहे.
साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचा दगडहा अशनी अतिशय दुर्मिळ असल्याचे जोशुआच्या लक्षात आले. अवकाशातून पडलेल्या त्या दगडाला पाहण्यासाठी जोशुआच्या घरी गर्दी व्हायला लागली. त्यातच एक अवकाशप्रेमी होता. त्याने नीट तपासणी केल्यानंतर जोशुआच्या घरावर पडलेला हा दोन किलो वजनाचा दगड साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचा असल्याचा निष्कर्ष काढला. अनेक रासायनिक गुणही त्यात होते.