अफगाणिस्तानअफगाणिस्तानवर सध्या चारीही बाजूंनी संकटं कोसळताहेत. ‘कोविड-१९’चे रुग्ण झपाट्याने वाढताहेत. मृतांची संख्याही वाढतेच आहे. त्यांच्यासाठी चिंतेची बाब म्हणजे अपुऱ्या आरोग्यसुविधांमुळे अनेक लोकांची तपासणीच झालेली नाही किंवा होऊ शकलेली नाही. त्यामुळे रुग्णांचा आकडा नेमका किती, हेच स्पष्ट होऊ शकलेले नाही.
अफगाणिस्तानातील आरोग्यसेवेचे वरिष्ठ अधिकारी सांगतात, ‘अज्ञानातल्या सुखाचा’ अनुभव सध्या आम्ही घेतो आहोत. आम्हाला दिसतंय, कळतंय, आमच्याकडे कोरोनाच्या पेशंट्सची संख्या किती असू शकेल ते! त्यांची चाचणी झाली नाही एवढंच. पण काबूलच्या गल्लीबोळात कोरोनाचे हजारो रुग्ण असतील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. पोहोचणार तरी कसं? आता आहे तीच व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. त्यात पेशंट्सची संख्या आणखी वाढली, तर पहिला बळी आरोग्यव्यवस्था आणि डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सहायक यांचा जाणार आही. डॉक्टरच राहिले नाही, तर काय हाहाकार उडेल याचं चित्र आम्हाला डोळ्यांसमोर दिसतंय. तरीही आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. ही महामारी आणखी वाढणार नाही यासाठी दुवा मागतोय. त्यात लोकं काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. लॉकआऊटच्या काळातही लोकांनी सोशल डिस्टन्सिंगची पार ऐशी की तैशी करून ठेवली आहे. यावर अफगाणिस्तानचे आरोग्यमंत्री फिरोजुद्दीन फिरोज यांनीही हात टेकले आहेत. ते म्हणतात, लोकांनी जर गांभीर्यानं विचार केला नाही, आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही, तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये जगात आमचा देश अग्रस्थानी असू शकेल!अफगाणिस्तानसमोरचं दुसरं संकट तर त्याहूनही मोठं आहे. एकीकडे देश कोरोनाच्या संकटात कसाबसा तग धरून राहण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे तालिबाननं आपल्या अतिरेकी कारवाया, हल्ल्यांमध्ये कुठलीही कमी केलेली नाही. हे हल्ले वाढतच आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरची काळजी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आरोग्यव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, वाढत्या रुग्णसंख्येची काळजी करावी की तालिबानचे हल्ले थांबवावेत, या त्रिचंडी प्राणायामात ते अक्षरश: हतबल झाले आहेत. त्यामुळे सरकारनं तालिबानसमोर जवळपास गुडघे टेकले आहेत. त्यांनी तालिबानला आवाहन केलं आहे. कोरोनानं असंही लोकं मरताहेत. निदान या काळात तरी तुम्ही हल्ले करू नका. कोरोना ना दुश्मनाला ओळखतो, ना दोस्ताला. सर्वांचा तो प्राण घेतो. त्यामुळे आता तरी हल्ले थांबवा आणि आपण दोघं मिळून कोरोनाविरुद्ध लढू, असं आवाहनही त्यांनी तालिबानला केलंय. तालिबान ते किती गंभीरपणे घेईल, हे माहीत नाही; पण त्यामुळे अफगाणी लोकांची मात्र पाचावर धारण बसली आहे हे निश्चित. इकडे आड, तिकडे विहीर अशी त्यांची स्थिती झाली आहे.