वॉशिंग्टन : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर, मुसलमान, आफ्रिकन-अमेरिकन आणि लॅटिनोज यांच्या होत असलेल्या छळामुळे स्वत: ट्रम्प दु:खी झाले असून, हा छळ थांबवा, असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे. छळ होत असल्याचे ऐकून मला दु:ख झाले. तो छळ थांबवा. माझ्या आवाहनामुळे मदत होणार असेल, तर मी ते थेट कॅमेऱ्यांसमोर करायला तयार आहे, असे ट्रम्प रविवारी सीबीएसला ‘सिक्स्टी मिनिट’ या मुलाखतीत बोलत होते. मुस्लीम्स, हिस्पॅनिक, अमेरिकन्स, अश्वेत लोक, वांशिक अल्पसंख्य आणि एलजीबीटी आदींचा द्वेष करण्याचे गुन्हे अलीकडच्या काळात वाढले असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प बोलत होते. छळ करणाऱ्या लोकांना तुम्ही काही सांगू इच्छिता का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मी म्हणेन छळ करू नका, तो भयानक आहे. मला हा देश एकत्र आणायचा आहे, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षांना मिळणारे वार्षिक चार लाख डॉलरचे वेतन न घेता, केवळ एक डॉलर घेणार आहेत व ते सुट्ट्यांमध्ये परदेशातही जाणार नाहीत, असे ट्रम्प म्हणाले. (वृत्तसंस्था)
अल्पसंख्याकांचा छळ थांबवा : ट्रम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2016 2:19 AM