समरकंद : सध्याचे युग हे युद्धाचे नाही असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधील संघर्ष आता संपुष्टात आणा, असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केले आहे. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची (एससीओ) यंदाची वार्षिक परिषद उझबेकिस्तानमधील समरकंद शहरात आयोजिण्यात आली आहे. त्या परिषदेला उपस्थित असलेल्या मोदी व पुतीन यांची शुक्रवारी भेट होऊन त्यांच्यात सुमारे पन्नास मिनिटे चर्चा झाली.
मोदी यांनी पुतीन यांना सांगितले की, जागतिक स्तरावर अन्न व ऊर्जा सुरक्षेसंदर्भात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अन्नसुरक्षा, इंधन, खते आदींचा मोठा प्रश्न विकसनशील देशांसमोरही उभा राहिला आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. पुतीन यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. त्यावर पुतीन यांनी मोदींना सांगितले की, युक्रेनच्या संघर्षाबद्दल भारताला वाटणाऱ्या चिंतेविषयी मला कल्पना आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपुष्टात यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. रशियाही त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. रशियाबरोबर चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास युक्रेनने नकार दिला आहे. त्यांना लढाईच्या माध्यमातूनच आपली उद्दिष्टे साध्य करायची आहेत. युक्रेनमध्ये जे घडत आहे, त्याची सारी माहिती रशिया सर्वांना वेळोवेळी देईल, असेही पुतीन म्हणाले.
मोदींनी शी जिनपिंग यांना ना केला शेकहॅण्ड, ना केले स्मितहास्यशांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)च्या वार्षिक परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवारी एका व्यासपीठावर आले. पण मोदी यांनी शी यांच्याशी शेकहॅण्डही तसेच त्यांच्याकडे पाहून स्मितहास्यही केले नाही. शी जिनपिंग यांना चार हात लांब ठेवणेच मोदी यांनी पसंत केले. पूर्व लडाखमध्ये चीन काढत असलेल्या कुरापती, गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांशी भारतीय जवानांचा झालेला संघर्ष, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला पाठीशी घालण्याचे चीनचे धोरण याबाबत भारत नाराज आहे. त्याचेच प्रतिबिंब एससीओच्या परिषदेत उमटले.
अद्याप निषेध नाहीरशियाला एकटे पाडण्याच्या प्रयत्नांत भारत सामील नसल्याबद्दल रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी प्रशंसा केली होती. युक्रेन युद्धाबाबत भारताने रशियाचा निषेध केलेला नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व पुतीन यांची समरकंद येथे भेट व चर्चा झाली.
पाकिस्तानचे ‘मिस्टर बिन’, पुतीन यांना हसू अनावर!
पुतीन यांच्याशी चर्चा सुरू करण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ त्यांचा इअरफोन कानात लावण्याचा प्रयत्न करत होते. पण, त्यांना तो लावता येत नव्हता. अखेरीस ते अन्य व्यक्तीला मदतीसाठी बोलावतात. हे बघून पुतीन हसू आवरण्याचा प्रयत्न करतात; पण ते त्यांना जमत नाही. घटना कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडीओ व्हायरल झाला. अनेकांनी शरीफ यांना पाकचे ‘मिस्टर बीन’ म्हटले आहे.