ऑनलाइन लोकमत
अंकारा (टर्की), दि. 3 - टर्कीचा सत्ताधारी पक्ष एके पार्टी आणि कुर्दीश विरोधक पक्षाचे सदस्य यांच्यामध्ये संसदेमध्ये अक्षरश: लाथाबुक्यांची हाणामारी झाली असून त्यामध्ये अनेकजणजखमी झाले आहेत. संसदपटूंना अटक करता येत नाही, या तरतुदीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
संसदपटूंना या कायद्यान्वये असलेले कायदेशीर संरक्षण काढून घ्यावे अशी सत्ताधारी एके पार्टीची मागणी आहे. मात्र, ही चाल कुर्दीश लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने त्यांच्याविरोधी असल्याचा दावा केला. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने हा असहिष्णू प्रकार असल्याचे म्हटले आणि आमचा आवाज दडपता येणार नाही असे ठणकावले.
विरोधी पक्षाचे सदस्य आधीच्या दहशतवादी गटाचे असून त्यांना अटक करायला हवी असं मत अध्यक्ष तय्यीप अर्दोजेन यांनी व्यक्त केलं होतं. परंतु, संसदपटूंना कायदेशीर संरक्षण असून त्यांना अटक करता येत नाही, परिणामी हा कायदाच बदलावा अशी सत्ताधारी पक्षाची मागणी आहे.
रॉयटर्सच्या प्रतिनिधीने आँको देखा हाल कथन केला असून या विधेयकावर चर्चा सुरू असताना, सदस्यांचा रागाचा पारा चढत गेला आणि वादावादी गुद्यांवर आली. लाथाबुक्यांचा प्रसाद एकमेकांना दिला गेला तर काहीजणांना पाण्याचा मारा केला.
अनेक संसदपटू जखमी झाल्याचे वृत्त सीएनएन टर्कने दिले आहे. सध्याच्या कायदेशीर तरतुदींनुसार, पोलीस खासदारांविरोधात गुन्ह्याच्या नोंदी करू शकतात, परंतु कायदेशीर प्रक्रिया ते खासदार असेपर्यंत सुरू करता येत नाही. परिणामी जोपर्यंत एखादी व्यक्ती टर्कीची लोकप्रतिनिदी आहे, तोपर्यंत तिला अटक करता येत नाही.