राणीची नातसून मेगन मर्केलने सासरच्यांचं रंगभेदी वागणं जगासमोर मांडलं. म्हणाली, माझा लेक पोटात असताना राजघराण्याला काळजी पडली होती, की वर्णाने कसा असेल कोण जाणे! सावळा किंवा काळाच असेल तर? मेगन स्वत: मिश्रवर्णाची, म्हणून तिच्या सासरघरच्या रेसिस्ट स्वभावाची ही एवढी चर्चा! पण बाळ झालं की, ते कुणावर गेलंय, रंग आईचा घेतला की बाबाचा, त्यातही मुलगी असल्यास ती गोरीगोरीपान,साधी उजळ, सावळी की काळीसावळीच ही सारी चर्चा आपल्याकडेही होते, उगाच परदेशस्थ रंगभेदाला का नावं ठेवावी. मात्र मिश्रवर्णीय जोडप्यांच्या मुलांचा रंग, त्यांचा केसांचा पोत हे सारे फार गंभीर प्रश्न आहेत. अशा अनेकांना जन्मभर स्व-प्रतिमेशी झगडावं लागतं. आपण रंगानं काळे आहोत म्हणून कुरूप आहोत असं वाटणाऱ्यांची संख्या आणि त्यांना तसं वाटायला भाग पाडणाऱ्या बाजारपेठेचं प्रचारबळ हे सारं काही कमी नाही. अशाच एका आईची ही गोष्ट. क्विआना ग्लाइड असं तिचं नाव. तिने अलीकडेच हफिंग्टन पोस्ट नावाच्या पोर्टलवर आपला अनुभव मांडला. त्या म्हणतात, ‘आय ॲम ब्लॅक, बट माय बायरेशियल बेबी लुक्स व्हाइट, धिस इज व्हॉट वी डील विथ!’ क्विआनाने गौरवर्णीय जोडीदाराशी लग्न केलं. तो गोरा, ही काळी. दोघांचं जग वेगळं. रंगामुळे सहन करावा लागणारा भेदभाव तर अतिभयंकर. ती आपल्या लेखात म्हणते, ‘माझा नवरा गोरा आणि मी काळी आहे. आम्हाला मुलगी होणार आहे हे कळताच पालक म्हणून आम्ही कामाला लागतो. तिचं पालनपोेषण कसं करायचं, यासाठी माहिती पुस्तकं गोळा करायला लागलो. वाटत होतं की, छान आनंदी आणि खंबीर व्हायला हवं आपलं मूल. तिला पुस्तकं आवडायला हवीत, वाचनाची गोडी लागायला हवी. आपण जसे आहोत तसे छान आहोत असं तिला वाटलं पाहिजे, स्वत:च्या रंगरुपाविषयी आत्मविश्वास वाटायला हवा..’
सुरुवातीला क्विआनाच्या डोक्यात हे पक्कं होतं की, आपल्याला होणारी मुलगीही कृष्णवर्णीय असणार, आपल्याइतकी डार्क नसली तरी ती काही ‘व्हाइट’ म्हणून जन्माला येणार नाही. जे आपण भोगलं ते आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये. म्हणून मग तिनं पुस्तकं जमवायला सुरुवात केली, काळ्या रंगाचे केस, त्याला लावायचे मणी, त्यांची काळजी ते मिश्रवंशीय पालकांची मुलं त्यांचे प्रश्न, त्यांना आपल्या रंगाविषयी पडणारे प्रश्न या साऱ्याविषयी वाचायला सुरुवात केली. काही स्व-मदत गटात सहभागी झाली. तिथं मिश्रवंशीय पालक आणि मुलांचे प्रश्न वाचून, समजून आपल्यासमोर पुढे काय प्रश्न येऊ शकतात हे सारं तिनं समजून घ्यायला सुरुवात केली.
क्विआना म्हणते, ‘हे सारं करताना माझ्या डोक्यात एक गोष्ट पक्की होती की, आपली मुलगी आपल्यासारखीच असणार. काळीसावळी. त्वचेतल्या मेलिनिनचे जिन्स मजबूत असतात, त्यामुळे ती आपल्यासारखीच दिसणार!’ पण झालं भलतंच, तिच्या लेकीचा लुनाचा जन्म झाला. छान गोरंगोमटं बाळ जन्माला आलं. क्विआनाला वाटत होतं की, जन्मत: ही मुलगी गोरी दिसत असली तरी मोठी होता होता ती सावळीच होणार. कृष्णवर्णीयच असणार; पण तसं झालं नाही. बाळ मोठं व्हायला लागलं, ते गोऱ्या वर्णाचं, निळसर करड्या डोळ्यांचं, सोनेरी केसांचं होतं. हे आपलं मूल आहे, आपल्यासारख्या कृष्णवर्णीय बाईला अशी गोऱ्या रंगाची मुलगी कशी झाली हेच क्विआनाला कळेना. तिचा नवरा सोबत होता, मूल कृष्णवर्णीय दिसणार असं क्विआनाला वाटत होतं तेही त्यानं स्वीकारलं, आता मुलगी गोरी-सोनेरी केसांची झाली तर तेही त्यानं स्वीकारलं; पण क्विआनाला ते झेपत नव्हतं. तिच्या आईनं तर तिला वैतागून सांगितलं की, तुला जर काळंच मूल हवं होतं तर तू काळ्या माणसाशी लग्न करायला हवं होतंस, गोऱ्या माणसाशी कशाला केलंस? पण क्विआना म्हणते, लग्न करताना तो गोरा आहे का काळा हे मी पाहिलं नाही, माझं त्याच्यावर प्रेम होतं, त्याचं माझ्यावर. पण त्यानं आता माझ्यातली तगमग शांत होईना. मला माझ्या मुलीत माझं काहीच सापडत नव्हतं. माझ्यासारखं काहीच नाही. ज्या रंगरुपाशी मी जन्मभर भांडण पत्करलं, हे म्हणजेच सौंदर्य नाही असं मानलं, तेच माझ्या घरात होतं. मला माझ्याच घरात वाळीत पडल्यासारखं, वेगळं असल्यासारखं वाटू लागलं. मी ‘ब्लॅक’ होते. माझं माझ्या ओळखीवर प्रेमही होतं. आणि आता माझ्या मुलीत त्यातलं काहीच नसावं..?’
- आपली पोटची पोर आणि रंगभेद अशी एक भलतीच लढाई क्विआनाला लढावी लागली; पण मग सापडलं का तिला उत्तर..?
दात : आईचे आणि लेकीचे!लुना वर्षाची झाली. सशाचे दोन दात तिच्या तोंडात लुकलुकताना दिसू लागले. मग क्विआनाने जुने फोटो काढले. ती स्वत: वर्षाची असतानाचा फोटो सापडला. तसाच लुनासारखा. दातात फट आणि तसेच लुकलुकणारे दात, गोबरे गोबरे गाल.. क्विआनाला उत्तर सापडलं, लेकीत आपल्यासारखं काय आहे हे दिसलं. रंगापलीकडचं मायलेकीचं नातं होतं, ते अखेर सापडलं..