इस्तंबुल : तुर्कस्तानच्या इस्तंबुलमध्ये एक प्रवासी विमान विमातळावर उतरताना घसरले. यावेळी या विमानाचे तीन तुकडे झाले. यावेळी विमानाच्या मागील भागात आग लागली. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. बोईंगचे 737 हे विमान जोरदार वारा आणि पावसामध्ये लँडिंगचा प्रयत्न करत होते.
विमानामध्ये 171 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर होते. विमानाने इजमिर शहरातून उड्डाण केले होते. इस्तंबुलच्या सबिहा गोजेन विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला. विमानाने पेट घेतल्यानंतर लगेचच आपत्कालीन टीमने ती विझविली. तसेच आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. घटनेनंतर आलेल्या फोटोंमध्ये काही लोक विमानाच्या मागच्या बाजुने बाहेर पडताना दिसत आहेत.
अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आला असून अन्य विमानांना दुसरीकडे वळविण्यात आले आहे. विमानामध्ये 20 जण परदेशी नागरिक होते, तर उर्वरीत तुर्कीचे नागरिक होते. इस्तंबुलचे गव्हर्नर अली येरलीकाया यांनी सांगितले की, पेगासस विमान वाहतूक कंपनीचे हे विमान खराब हवामानामुळे रनवेवर 50 ते 60 मीटर घसरले.
जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये दक्षिण कोरियाचा एक नागरिक असून सर्व जखमींवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. विमान दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.