बीजिंग:चीनच्या सरकारने पुन्हा एकदा आपली हुकूमशाही विचारधारा दाखवणारा निर्णय घेतला आहे. देशातील कम्युनिस्ट सरकारने परदेशी विचारधारेचा प्रभाव मुलांवर पडू नये, यासाठी खासगी शिकवणी/शाळेवर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील खासगी शिक्षण देणाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
चीनी तज्ञांच्या मते, सरकारने खासगी क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी आणि सरकारी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पण, यामागचा दुसरा हेतू म्हणजे, सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये चीन सरकार आपल्या मर्जीची विचारधारा पेरू शकतं. म्हणजेच लहान मुलांच्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा डाव आहे. हाँगकाँग पोस्ट नावाच्या वृत्तपत्राने अनेक तज्ञांशी बोलल्यानंतर चीन सरकारच्या निर्णयाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केलाय.
चीनला परदेशा हस्तक्षेप नकोयया निर्णयामागे चीनी सरकारच्या मनात असलेला परदेशी विचारधारेबद्दलचा तिरस्कार आहे. खाजगी शिकवणी किंवा शाळांमधून विद्यार्थ्यांच्या मनात परदेशी विचारधारा पेरली जाऊ शकते, अशी चीन सरकारला भीती आहे. दरम्यान, खासगी शाळेत मुलांवर दबाव असतो आणि सरकारी शाळेत हा दबाव कमी केला जातो, असा चीन सरकारने युक्तीवाद केलाय. पण, सामान्यांना सरकारचा हा युक्तीवाद पटलेला नाही. आधीच हुकूमशाही निर्णय घेण्यासाठी चीन बदनाम आहे. त्यात आता मुलांच्या शिक्षणासंबंधी घेतेलेला हा निर्णय जगभर चर्चेचा विषय बनला आहे.