जगातली सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण? त्याच्याकडे किती संपत्ती आहे? सध्या पहिल्या क्रमांकावर कोण? आहे, याबाबत आपल्याला प्रचंड आकर्षण असतं. कधी ती व्यक्ती बिल गेट्स असते, कधी जेफ बेझोस, कधी एलॉन मस्क तर कधी बर्नार्ड अर्नाल्ट.. बऱ्याचदा त्यांच्या संपत्तीचे आकडे आपल्याला मोजताही येत नाहीत. पण, त्या नंबरांचं आणि त्या व्यक्तींचं आपल्याला आकर्षण असतं. सर्वसामान्यांना आणखी एक आकर्षण असतं, ते म्हणजे या श्रीमंतांकडे, सेलिब्रिटींकडे, बॉलिवूड, हॉलिवूड सिताऱ्यांकडे कोणत्या महागड्या कार्स आहेत याचं. जगात नव्यानंच तयार होणाऱ्या महागड्या आणि आकर्षक कार्सवर अनेकांचा डोळा असतोच. प्रदर्शनातही या कारजवळ उभं राहून फोटो, व्हिडिओ काढण्यात अनेकांना धन्यता वाटते. कार्सचं हे आकर्षण सगळ्या जगभरात आहे. त्यामुळे बऱ्याचदा अनेकांचा सोशल मीडियाही या कार्सच्या फोटोंनी भरलेला असतो.
पण, जगातलं एक खेडं असं आहे, जिथे जगातल्या सर्वोत्तम, आलिशान आणि महागड्या सुपर कार्स एकाच वेळी पहायला मिळू शकतात. या गावाचं नाव आहे ‘ॲल्डर्ली एज’. ब्रिटनमध्ये चेशायर भागात हे गाव आहे. ‘जगातलं सर्वाधिक श्रीमंत खेडं’ म्हणूनही हे गाव प्रसिद्ध आहे. या खेड्यात जर तुम्हांला एखादं छोटंसं घर घ्यायचं असेल, तर त्यासाठी कमीत कमी नऊ कोटी रुपये तरी मोजावे लागतील! याला ‘खेडं’ अशासाठी म्हणायचं, कारण या गावाची लोकसंख्या केवळ ४७८० इतकी आहे. आपल्याकडची अनेक खेडीही लोकसंख्येच्या दृष्टीनं यापेक्षा कितीतरी मोठी आहेत. जगातली जवळपास प्रत्येक सुपरकार या गावात आहे. जगात कोणतीही नवी कार आली तरीही ती इथे पहायला मिळू शकते.
लक्षावधी रुपये किंमत असलेल्या दोनशेपेक्षाही जास्त सुपर कार्स या छोट्याशा खेड्यात आहेत. मोठमोठ्या शहरांत आणि राजधानीतही ज्या कार्स सहजपणे पहायला मिळत नाहीत, त्या कार्स इथे अगदी जवळून पहायला मिळत असल्यानं या कार्स पाहण्यासाठी, आपल्या डोळ्यांचं पारणं फेडण्यासाठी, त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकताना आपणही जणू ‘सेलिब्रिटी’ बनण्यासाठी अनेक हौसे-नवसे-गवसे यांची या गावात गर्दी असते. केवळ या गाड्या पाहण्यासाठी आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी कुठून कुठून लोक येतात. वीकेंडला, शनिवार-रविवारी तर अशा अनाहूत पाहुण्यांची इथे अक्षरश: जत्रा जमलेली असते.
लॅम्बॉर्गिनी, बुगाटी, ऑडी, मर्सिडीज, बेंटले.. अशा कितीतरी आणि जगातल्या सर्वोत्तम, सर्वात महागड्या गाड्या या खेड्यातल्या रस्त्यावरून धावत असतात. त्यामुळेच त्याला ‘नाइट्सब्रिज ऑफ नॉर्थ’ असंही म्हटलं जातं. केवळ या गाड्यांमुळे हे खेडं एक पर्यटनस्थळ झालं आहे. पण, या गर्दीचा आणि अचानक रस्त्यावर येऊन फोटो काढणाऱ्यांचा तेथील लोकांना आता त्रास होऊ लागला आहे. केवळ हौसे-गवसेच नाही, अनेक वृत्तपत्रांचे, माध्यमांचे छायाचित्रकारही कार्स आणि सेलिब्रिटींचे फोटो काढण्यासाठी इथे ‘पडिक’ असतात. रिकाम्या लोकांच्या गर्दीमुळे बऱ्याचदा ट्राफिक जामचाही अनुभव येतो आणि त्यांना टाळण्यासाठी कारमालक वेगमर्यादेचंही उल्लंघन करतात. त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे. इथल्या ‘रिकामटेकड्या’ लोकांची गर्दी हटवावी अशी तक्रार आता तिथल्या स्थानिकांनी पोलिसांतही केली आहे. बुर्नेज येथील जाॅर्डन बेलशम हा २३ वर्षीय तरुण इन्स्टाग्रामवरही कायम इथे पडिक असतो. वीकेंडला तर किमान बारा तास तो इथे असतो. आपल्या अकाउंटवर तो इथले फोटो टाकत असतो. त्यामुळे तोही जणू ‘सेलिब्रिटी’ झाला आहे. जॉर्डन सांगतो, इथे यायला, तासन्तास घालवायला मला फार आवडतं. न खाता-पिताही अनेक तास मी इथे सहज घालवू शकतो. ज्या कार तुम्हांला फोटोतही पहायला मिळत नाहीत, अशा अनेक भारी भारी कार जेव्हा तुमच्या शेजारून, तुम्हाला चिटकून जातात, समोर उभ्या दिसतात, तेव्हा काय वाटतं हे शब्दांत सांगता येणार नाही. त्या दिवशी तुमचं नशीब जोरावर असेल, तर जगातली सर्वोत्तम कारही तुमच्या पुढ्यात येऊन थांबू शकते! या खेड्यात नुसत्या कार्सच नाहीत, तर त्याबरोबर त्यात असलेले अनेक मोठमोठे सेलिब्रिटी, स्टार्स, कराेडपती उद्योजक, फुटबॉल प्लेअर्स यांचंही दर्शन होत असल्यानं अनेक चाहते या गावाला जणू चिकटलेलेच असतात.
दुसरा एक २२ वर्षीय तरुण कारप्रेमी पॅट्रिक लेव्हर याचं म्हणणं आहे, मला लहानपणापासून कार्सची आवड आहे आणि इथे तर कार्सचं नंदनवनच असल्यानं मी इथेच पडिक असतो. एकदा तर माझ्यासमोर ‘झोंडा एफ’ची कार्बन एडिशन येऊन उभी राहिली. संपूर्ण जगात या फक्त पंचवीसच गाड्या आहेत!
‘दुसरीकडे जाऊन मर की’! लोक आता या कारवेड्या लोकांना वैतागले आहेत. कोणी अनोळखी व्यक्ती रस्त्यात घुसून फोटो काढताना दिसला की ‘पापाराझी’ समजून ‘फोटो काढायला दुसरीकडे मर की’ असं म्हणून त्याच्यावर ते खेकसतात. गाड्यांची वेगमर्यादा इथे प्रतितास केवळ तीस किलोमीटर आहे, पण या ‘पापाराझींना’ टाळण्यासाठी ताशी शंभर किलोमीटर वेगानंही ते गाड्या पिटाळतात.