ऑनलाइन लोकमत
मनीला, दि. 15 - फिलीपीन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते यांनी देशातील सैनिकांना एक विचित्र आदेश दिला आहे. जर दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवलं असेल किंवा ते ओलीस नागरिकांना घेऊन पळत असतील तर त्यांच्यासोबत ओलीस ठेवलेल्यांनाही बॉम्बस्फोट करून उडवून द्या असा आदेश त्यांनी दिला आहे. याशिवाय देशात मार्शल लॉ लागू करण्याचा इशाराही त्यांनी दिला. देशात अंमलीपदार्थांची समस्या वाढली तर असा आदेश देऊ शकतो असं ते म्हणाले.
समुद्रात गेल्या काही दिवसांमध्ये अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत, यावर आळा बसावा म्हणून दहशतवाद्यांना बॉम्ब टाकून उडवण्याचे आदेश मी सैनिकांना दिले आहेत, यामुळे खंडणी मागणा-या दहशतवाद्यांविरोधात लढण्यास मदत होईल आणि अशा घटना कमी होतील असं ते म्हणाले.
ओलीस ठेवलेल्यांना बॉम्बने उडवणं कितपत योग्य आहे असं त्यांना विचारलं असता तुम्ही स्वतःचं अपहरण होणार नाही याची काळजी घ्या असं सल्ला त्यांनी दिला.
यापुर्वीही दुतर्ते वादात राहिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना ते वेश्येचा मुलगा असल्याचं एकदा म्हणाले होते. पाचपैकी तीन अमेरिकेचे नागरिक मुर्ख असतात असंही ते म्हणाले होते.