इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये मार्च २०२२ ते मार्च २०२३ या एका वर्षाच्या कालावधीत महाागईमध्ये ३५.३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १९६५ नंतर पाकिस्तानात प्रथमच यंदा महागाईने इतके भीषण रूप धारण केले असून, गेल्या ५८ वर्षांतील तो उच्चांक आहे. ही माहिती त्या देशाच्या सांख्यिकी विभागाने दिली आहे. पाकिस्तानातील महागाईमुळे तेथील जनतेला अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे.
पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. १६ हजार कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी चीनने पाकला मुदत वाढवून दिली आहे. पाकमध्ये गेल्या एक वर्षात अन्नधान्य, वाहतूक, मद्य या गोष्टींच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. वर्षभरात अन्नधान्याच्या किमतीत ४७.२ टक्के, मद्याच्या दरात ५० टक्के, वाहतूक दरात ५४.९ टक्के वाढ झाली.
हायपर इंफ्लेशनच्या दिशेने पाकिस्तान
सर्व वस्तूंची किंमत दुप्पट होते त्यास हायपर इंफ्लेशन असे म्हणतात. पाकिस्तान त्या दिशेने वाटचाल करत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती नजीकच्या काळात न सुधारल्यास श्रीलंकेत जसे अराजक माजले तशी स्थिती उद्भवू शकते, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.