मॉस्को : रशियाच्या पूर्वेकडे दुरवरील भागात शनिवारी शक्तिशाली भूकंप झाला. त्याची तीव्रता ७.० रिश्टर स्केल होती. तथापि, यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही, असे रशियन आणि अमेरिकन प्रशासनाने सांगितले. जीएमटीनुसार पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू कामचटका तराई डोंगरात १६० कि.मी. खोलीवर होता, असे अमेरिकी भूगर्भशास्त्र विभागाने सांगितले, तर रशियाच्या आपत्कालीन स्थितीत मंत्रालयाच्या स्थानिक शाखेने केंद्रबिंदू प्रांतिक राजधानी पेट्रोपावलोव्हस्क-कामचाटस्कीच्या वायव्येला होता, असे सांगितले. दाट लोकवस्तीच्या भागातील रहिवाशांना ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. पहिल्या भूकंपानंतर काही मिनिटांनी ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपोत्तर धक्का जाणवला, असे रशियन अकॅडमी आॅफ सायन्सेसने म्हटले आहे. रिंग आॅफ फायरच्या जवळ हा भूकंप झाला. प्रस्तरभंगाचे चक्राकार जाळे असलेल्या भागाला रिंग आॅफ फायर असे म्हणतात. (वृत्तसंस्था)