दिल्लीसह पाकिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तानमध्ये काल रात्री सव्वा दहाच्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपामध्येपाकिस्तानमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून १८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
हा भूकंप एवढा तीव्र होता की काही सेकंद याचे हादरे जाणवत होते. यामुळे नागरिकांनी घाबरून घराबाहेर पलायन केले होते. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ इतकी नोंदविली गेली होती. यानंतर लगेचच पाकिस्तानात 3.7 तीव्रतेचा आफ्टरशॉक आला होता.
पाकिस्तानात अनेक घरांना नुकसान झाले आहे. यामुळे आरोग्य मंत्र्यांनी अब्दुल कादिर पटेल यांनी पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज (PIMS) सह सरकारी हॉस्पिटलना इमरजन्सी अलर्ट जारी केला होता. लाहौर, इस्लामाबाद, रावलपिंडी, क्वेटा, पेशावर, कोहाटसह अन्य शहरांमध्ये हादरे बसले होते.
अफगानिस्तानच्या हिंदू कुश येथे भूकंपाचे केंद्र होते. हे ठिकाण पाकिस्तानपासून १८० किमी दूरवर होते. भूकंपामुळे पाकिस्तानात ९ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे अफगानिस्तानमध्ये एका मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाला घाबरून काही लोकांनी रस्त्यावरच झोपडी उभारून तिथेच रात्र घालवली आहे. भूकंपाचे धक्के एवढे जोरदार होते की घरात जाण्याची हिंमत झाली नाही असे काबुलच्या नूर मोहम्मद यांनी म्हटले.
गेल्या वर्षी जूनमध्ये अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता. यामध्ये 1000 लोकांचा मृत्यू झाला होता. हजारो लोक बेघर झाले होते, तेव्हा भूकंपाची तीव्रता ५.९ होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात ५५ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. दोन्ही देशांमध्ये लाखो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.