ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २० - समाजात शिक्षकी पेशाला आदर, सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गुरुस्थानी असतो. पण बदलत्या काळानुसार शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे शिक्षकी पेशाबद्दलचा हा आदर, सन्मान लोप पावत चालला आहे. जगभरात शिक्षकांना मारहाणीच्या त्यांच्यावरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत.
दक्षिण अमेरिकेतील देश अर्जेंटिनाने समाजातील शिक्षकांचे महत्व लक्षात घेऊन शिक्षकांच्या सुरक्षेसाठी विशेष कायद्याचा प्रस्ताव तयार केला आहे. नव्या कायद्यात अन्य नागरीकांसारखा शिक्षकांवर हल्ला केला तर, जास्त शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरीकावर हल्ला केल्यानंतर जी शिक्षा होते त्यापेक्षा २५ टक्के जास्त तुरुंगवास शिक्षकावर हल्ला केल्यानंतर भोगावा लागेल.
अर्जेंटिनाचे शिक्षणमंत्री इस्टेबॅन बुलरिच यांनी ही माहिती दिली. शिक्षकांबद्दलचा आदर, धाक वाढावा यासाठी ही तरतुद केल्याचे त्यांनी सांगितले. अर्जेंटिना काँग्रेसने अद्याप या कायद्याला मंजुरी दिलेली नाही. फक्त मारहाणच नव्हे तर शिक्षकाला शाब्दीक अपशब्द वापरणे, धमकावण्यासाठीही शिक्षेची तरतुद आहे.