रोम – इटलीच्या सॅट्रियानो शहरात एका विद्यार्थिनीचा भयानक मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. २० वर्षीय विद्यार्थिनी सिमानो कॅवलारो(Simona Cavallaro) तिच्या मित्रांसोबत पिकनिकला जंगलात गेली होती. त्यावेळी तिथे जे काही घडलं तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. पिकनिकसाठी गेलेली सिमानो पुन्हा कधीच घरी परतणार नाही असा विचारही कुणी केला नसावा. जंगलात घडलेला ह्दयद्रावक प्रकार ऐकून अनेकांच्या अंगावर काटा येईल.
सिमानो कॅवलारो हिच्यावर जंगली कुत्र्यांनी हल्ला करत अक्षरश: तिचे लचके तोडले. अचानक आलेल्या कुत्र्यांच्या टोळीनं रोमॅन्टिक स्थळी मृत्यूचा हाहाकार माजवला. गर्लफ्रेंडची अवस्था पाहून कसंबसं प्रियकराने स्वत:चा जीव वाचवत तेथून पळ काढला. सिमानो कॅवलारोच्या बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा करण्यात आला नाही. प्रियकरानं एका जुन्या अनेक काळापासून बंद पडलेल्या एका झोपडीत लपत स्वत:ला वाचवलं. प्रियकराचं नशीब बलवत्तर म्हणून त्याच्या मोबाईलला नेटवर्क मिळालं आणि त्याने वेळीच आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावणाऱ्या अधिकाऱ्यांना कॉल केला.
प्रेयसी आणि प्रियकर एका ग्रुपच्यासोबत घरातून पिकनिकसाठी निघाले होते. या दोघांसोबत असणारे इतर वेळेआधीच जंगलातून बाहेर पडले. परंतु दोन्ही कपल्सना आणखी काही काळ एकमेकांसोबत वेळ घालवायचा होता. त्यामुळे ते दोघंही जंगलात वॉक करण्यासाठी बाजूला गेले. डेली मेलच्या प्रकाशित वृत्तानुसार, वनविभागाचे अधिकारी आणि आपत्कालीन सेवा पोहचण्याआधीच जंगली कुत्र्यांनी युवतीच्या शरीरावर ठिकठिकाणी चावा घेतला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सिमानो कॅवलारोला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं. याठिकाणी सिमानोवर उपचार सुरू असताना तिने अखेरचा श्वास घेतला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, या जंगलात असणाऱ्या जंगली कुत्र्यांच्या टोळीवर नियंत्रण आणण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर पोलीस युवतीच्या मृत्यूनंतरही तपास सुरू ठेवणार असल्याचं सांगत आहेत. परंतु सिमानो कॅवलारोच्या अचानक जाण्यानं तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पिकनिकसाठी गेलेली मुलगी आता कधीच घरी परतणार नाही यावर कुटुंब विश्वास ठेवायला तयार नाहीत. सध्या सिमानो कॅवलारोचा प्रियकरही तणावाखाली आहे.