अमेरिकेतील इंडियाना राज्यात असणाऱ्या प्रतिष्ठित पर्ड्यू विद्यापीठात शिक्षण घेत असताना बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. विद्यापीठाने याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नील आचार्य हा भारतीय विद्यार्थी रविवारी बेपत्ता झाला होता. मात्र आता पर्ड्यूमधील मॉरिस जे. जुक्रो प्रयोगशाळेजवळ नीलचा मृतदेह आढळून आला. उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या तरुण पोराचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नील आचार्य हा तरुण गायब झाल्याचं लक्षात येताच त्याच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आणि आपल्या मुलाल शोधण्याचं आवाहन केलं. नीलची आई गौरी आचार्य यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "आमचा मुलगा नील आचार्य हा काल २८ जानेवारी रोजी बेपत्ता झाला आहे. तो अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिक्षण घेत होता. ज्या उबर ड्रायव्हरने नीलला विद्यापीठात सोडलं होतं, त्यानेच नीलला शेवटचं बघितलं होतं. आम्हाला नीलची काहीही माहिती मिळत नसून तुम्हाला याबाबत काही समजलं तर कळवा," असं आवाहन गौरी आचार्य यांनी केलं होतं. मात्र आता थेट नीलचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मागील आठवड्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील जॉर्जियामधील लिथोनिया शहरात एका २५ वर्षीय माथेफिरू तरुणाने भारतीय विद्यार्थ्याच्या डोक्यावर हातोड्याचे ५० वार करत त्याची हत्या केली होती. त्यानंतर आता आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.