दोन बोगद्यांमधून 150 मैल प्रति तासहून अधिक वेगाने विमान उडवून एका पायलटने इतिहास रचला आहे. पायलटच्या या खतरनाक कारनाम्याने पाच नवीन जागतिक रेकॉर्ड बनविले आहेत. आजवर कोणीही दोन सुरुंगांच्या मधून एवढ्या प्रचंड वेगाने विमान उडविलेले नाहीय. हा कारनामा इटलीचा स्टंट पायलट डारियो कोस्टाने (Dario Costa) केला आहे. (Stunt Pilot Dario Costa Sets World Record for Flying Race Plane Zivko Edge 540 Through Tunnels Near Istanbul in Turkey)
कोस्टाने तुर्कीच्या इस्तंबूलमधील दोन बोगद्यांच्या मधून जिवको एज 540 रेसिंग विमान उडविले. हा खतरनाक स्टंट करताना धाडस आणि अचूक कौशल्याची आवश्यकता होती. कैटाल्का मेवकीच्या उत्तरेकडील मरमारा हायवेवर हे दोन सुरुंग आहेत. डारियो कोस्टाने एका बोगद्यातून विमान उडविण्यास सुरुवात केली, दुसऱ्या मोठ्या बोगद्यातून ते उडवत बोगदा संपल्यावर हवेत उंच नेत परत खाली वळविले.
धक्कादायक बाब म्हणजे वाऱ्याची दिशा त्याच्या उलट होती. यामुळे विमान हवेत हेलकावे घेण्याची शक्यता अधिक होती. तरीदेखील त्याने रिस्क घेतली आणि 360-मीटरच्या पहिल्या सुरुंगातून विमान पळविले. नंतर 1160 मीटर लांबीच्या सुरुंगातून ते विमान जमिनीला समांतर ठेवत वेगाने उडविले. हा स्टंट पूर्ण करण्यासाठी कोस्टाला 43.44 सेकंदांचा वेळ लागला. स्टंट पूर्ण होताच कोस्टाने हवेत वर जात 360 डिग्रीचा लूप घेत आनंद व्यक्त केला.
पाच रेकॉर्ड कोणते...डारियो कोस्टाने या कारनाम्यात पाच वर्ल्ड रेकॉर्ड केले. यामध्ये पहिल्यांदाच एखाद्या टनेलमध्ये विमान उडविणे, सर्वात जास्त लांबीच्या टनेलमध्ये विमान उडविणे, एका ठराविक लिमिटमध्ये सर्वात जास्त वेळ विमान उडविले. एकाचवेळी दोन सुरुंगांमध्ये विमान उडविण्याचे रेकॉर्ड आणि पाचवा पहिल्यांदा टनेलमधून विमानाचे टेक ऑफ करण्याचे रेकॉर्ड यामध्ये सहभागी आहेत. या स्टंटसाठी 40 जणांची टीम काम करत होती.