इस्लामाबाद - सध्या फॅशनेबल दाढी ठेवण्याचा ट्रेंड सुरु आहे. अनेक तरुण विराट कोहलीप्रमाणे तसंच आपल्या आवड्या अभिनेत्याप्रमाणे स्टायलिश दाढी ठेवण्यावर भर देत आहेत. मात्र पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात मुस्लिम तरुणांनी अशाप्रकारे स्टायलिश दाढी ठेवणे इस्लामविरोधी असल्याचं सांगत बंदी आणण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील डेरा गाझी खान जिल्ह्यात फॅशनेबल दाढीवर बंदी आणली जावी अशी मागणी करणारा ठरावच मंजूर करण्यात आला आहे.
हा ठराव मांडणारे आसिफ खोसा यांनी सांगितलं आहे की, 'आजकाल तरुण फॅशनच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारची दाढी ठेवत असतात. पण हे इस्लामविरोधी आहे'. पाकिस्तानी तरुणांमध्ये सध्या फॅशनेबल दाढीचा ट्रेंड सुरु असून डेरा गाझी खानच्या उपायुक्तांना अशा तरुणांवर कारवाई करण्याचा आदेश देण्यात यावा असं ठरावात नमूद करण्यात आलं होतं.
फॅशनेबल दाढी ठेवत दाढीचा अपमान करणा-यांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणीच ठरावातून करण्यात आली होती. बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी उपायुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.