ऑनलाइन टीम
न्यूयॉर्क, दि. १३ - भारतीय वंशांच्या दोघा प्राध्यापकांना गणितामधील मानाचा समजला ग्लोबल पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये सुभाष खोत या मुंबईकर तरुणाचाही समावेश असून इंटरनॅशनल मॅथमेटीकल यूनियनने (आयएमयू) खोत यांना रोल्फ नेवालिन्ना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर प्राध्यापक मंजूल भार्गव यांना गणितामधील नोबेल समजल्या जाणा-या 'फिल्ड्स मेडल' हा पुरस्कार देण्यात आला आहे.
आयएमयूतर्फे दर चार वर्षांनी ग्लोबल पुरस्कार दिले जातात. गणितामध्ये भरीव योगदान देणा-यांना हा पुरस्कार दिला जातो. २०१४ साठी आयएमयूने भारतीय वंशांच्या दोघा प्राध्यापकांना हा पुरस्कार दिला आहे. मंजूळ भार्गव यांना फिल्ड्स मेडल हा पुरस्कार देण्यात आला आहे. भार्गव यांच्यासह इराणी वंशांच्या गणिततज्ज्ञ मर्यम मिरजाखनी आणि अन्य दोघांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फिल्डस मेडल हा पुरस्कार गणितक्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. भूमितीतील संशोधनासाठी भार्गव यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. १९७४ साली कॅनडा येथे जन्मलेले भार्गव यांचे शिक्षण अमेरिकेतच झाले. मात्र बराच काळ ते भारतातही वास्तव्यास होते. भार्गव यांनी प्रिन्सटन महाविद्यालयातून २००१ मध्ये पीएचडी प्राप्त केली आहे.
मुंबईकर सुभाष खोत यांना रोल्फ नेवालिन्ना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खोत यांनी मुंबई आयआयटीतून शिक्षण घेतले आहे. यूनिक गेम्समधील संशोधनात मोलाचे योगदान दिल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. खोत हे सध्या न्यूयॉर्क विद्यापीठात कॉम्प्यूटर सायन्सविभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.